‘आर्थिक लाभ होत असेल, तर गोवा राज्य ही कॅसिनोची राजधानी घोषित करू !’
या केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या वक्तव्याचे समाजात उमटले तीव्र पडसाद !
गोवा ही परशुरामभूमी आणि मंदिरांची भूमी आहे. पर्यटनाच्या नावाने गोव्याला भोगभूमी करणे जनतेला अपेक्षित नाही !
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – लोकांनीच गोव्याला कॅसिनोची राजधानी म्हणून घोषित केलेली आहे. त्यामुळे सरकारकडून तशी घोषणा करण्याची आवश्यकता नाही, तरीही कॅसिनोमुळे गोव्याला आर्थिक लाभ होत असेल, तर आम्हीही (केंद्र सरकार) निश्चितच गोव्याला ‘कॅसिनो राजधानी’ म्हणून घोषित करू, असे वादग्रस्त वक्तव्य ४ डिसेंबर या दिवशी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केले होते. पत्रकार परिषदेत ‘गोव्याला कॅसिनोची राजधानी म्हणून घोषित करण्याचा विचार आहे का?’, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन. रेड्डी हे उत्तर दिले होते. पत्रकार परिषदेला केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर आणि आमदार दयानंद सोपटे यांचीही उपस्थित होती. या वक्तव्याचे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत.
People have already given ‘casino capital’ title to Goa: Union minister https://t.co/whl718Nwje pic.twitter.com/vgmJssaKIk
— The Times Of India (@timesofindia) December 4, 2021
केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी गोव्यातील विविध पुरातन पर्यटन प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये कुर्डी येथील प्राचीन श्री महादेव देवस्थान, जुने गोवे येथे सेंट कॅथड्रल चर्च आणि आग्वाद येथील किल्ला या प्रकल्पांचा समावेश आह, तसेच नवीन प्रकल्पांची पायाभरणीही केली जाणार आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदर बांधणीचे काम आणि सध्या असलेल्या बंदरांचे काम जोरात चालू आहे. ‘क्रूझ’ पर्यटनासाठी (जलमार्गे पर्यटनस्थळांना भेटी देणे) ते सोयीचे ठरणार आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
(सौजन्य : ingoanews)
केंद्रीय पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांनी त्यांची विकृत घोषणा मागे घेऊन गोमंतकियांची क्षमा मागावी ! – प्राचार्य सुभाष वेलिंगकर
केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या गोव्याच्या संदर्भातील घृणास्पद वक्तव्याचा मी एक गोमंतकीय म्हणून कडाडून निषेध करतो. गोव्याने देवभूमी, पुण्यभूमी आणि धर्मभूमी, ही ओळख, पोर्तुगिजांचे क्रौर्य आणि बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात ४५० वर्षे प्रखर झुंज देऊन अखंड राखलेली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात ही प्रतिमा पद्धतशीरपणे ‘रोम ऑफ द इस्ट’ (पूर्वेकडील रोम) आणि ‘Land of ३ ps – Pig, Peg and Prostitutes’ ( डुक्कर, दारू आणि वेश्या यांची भूमी) अशी पालटण्याचे प्रयत्न झाले. त्याला गोमंतकियांनी तीव्र विरोध केला होता.
काँग्रेसला पराभूत करून लोकांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाचे सरकार सत्तेवर आणले होते; परंतु दारूण अपेक्षाभंग करून भाजपा शासनाने कॅसिनोची संख्या ६ वर आणली. राजधानी पणजीच्या नावाला जुगार्यांचे शहर बनवून कायमचा कलंक लावला. आता पर्यटनमंत्री रेड्डी गोव्याला भारताची कॅसिनो राजधानी बनवण्याची घोषणा करत आहेत, ही विनाशकाले विपरीत बुद्धीच आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी त्यांची ही विकृत घोषणा मागे घेऊन गोमंतकियांची क्षमा मागावी, अशी मागणी आम्ही गोमंतकीय करत आहोत.