मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मुंबई, ६ डिसेंबर (वार्ता.) – मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासनाने आणखी काही तरी करायला हवे. मराठी भाषेचा स्वाभिमान आपण जपायला हवा. साहित्यिकांना विनंती आहे की, मराठी साहित्य नव्या पिढीपुढे पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी भाषा हे आपल्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. मराठी भाषेला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नाशिककर आणि महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भगूर येथे जन्म घेतला. त्यांनी चालू केलेल्या क्रांतीकार्यात अनेक क्रांतीकारक सहभागी झाले. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध येथेच केला. त्या भूमीत हे साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडले त्याचा आनंद आहे. मुगलांच्या काळात मराठी भाषेचा र्हास होत गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत:ची राजभाषा पारशी ठेवली नाही, तर संस्कृत ठेवली. त्यांनी पारशी भाषेचा सुळसुळाट न्यून केला. रघुनाथ हनुमंत यांना संस्कृत आणि प्राकृतिक भाषेचा ज्ञानकोश सिद्ध करण्याचे दायित्व सोपवले. त्यानंतर इंग्रजांच्या काळात मराठी भाषेचा र्हास होत गेला. लोकमान्य टिळक अशुद्ध भाषेत लिखाण करणार्यांवर आसूड ओढत. २० व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती गोखले, गोपाळ आगरकर यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्य केले. मराठी भाषेचे स्वामित्व अबाधित रहायला हवे. राज्यकारभारात मराठी आली; मात्र आजही न्यायनिवाड्यामध्ये मराठीला स्थान नाही. इंग्रजांनंतरही मराठी भाषेचा प्रवास खडतर राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांनी वर्ष १९६९ मध्ये मुंबई महाविद्यालयात मराठी भाषा विभाग स्थापन झाला. यशवंतराव चव्हाण यांनी स्वतंत्र मराठी भाषा संचलनालय चालू केले. आपल्या भाषेचा संवर्धनासाठी इतक्या वर्षांत काय झाले, याचा लेखाजोगा मांडला पाहिजे.’’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून वाद निर्माण होणे, ही चांगली गोष्ट नाही ! – शरद पवार
अलीकडे साहित्य संमेलन म्हणजे वाद घडणे हा नियम झाला आहे कि काय अशा पद्धतीने सातत्याने वाद होत आहेत. स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्यातील योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही. त्यांनी केलेले लिखाण अजरामर आहे. हे मराठी भाषा विसरू शकत नाही, तसेच कुसुमाग्रज यांच्या साहित्याची चर्चा होऊ शकत नाही. मग वाद कशासाठी ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून वाद निर्माण होणे, ही चांगली गोष्ट नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. (संमेलनाच्या आरंभी केलेल्या गीतामध्ये त्यांचा उल्लेख व्यवस्थित केला असता, तर वाद निर्माण झालाच नसता ! – संपादक) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नाशिककर आणि महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. |
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शरद पवार यांनी सुचवलेल्या सूचना :
१. परकीय भाषांचे अनेक शब्द मराठीत प्रवेश करत आहेत. मराठी भाषेचा शब्दकोश काळानुसार सुधारणे आवश्यक आहे.
२. बोली भाषेला मराठीत अधिकाधिक स्थान द्यायला हवे.
३. सोपे शब्द मराठीत आले, तर भाषेची गोडी आणखी वाढेल.
४. पाठपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणणे आवश्यक आहे. अन्यथा मराठी मागे पडेल.
५. लहान मुलांना इंग्रजी आवश्यक आहे, या भूमिकेतून शालेय शिक्षणात इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. मराठी भाषेसाठी हा मोठा धोका आहे.
६. मराठी भाषेचा सुलभसंच विकसित करायला हवा.