श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथ प्रदक्षिणेस प्रशासनाकडून बंदी !
म्हसवडवासियांनी दिली ५ डिसेंबर या दिवशी ‘म्हसवड बंद’ ची हाक !
सातारा, ४ डिसेंबर (वार्ता.) – म्हसवड (जिल्हा सातारा) येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथप्रदक्षिणेस तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी बंदी घातली आहे. ५ डिसेंबर यात्रेचा मुख्य दिवस असून यात्रेकरूंचे म्हसवड नगरीमध्ये आगमन झाले आहे. तहसीलदार यांनी घातलेली बंदी ३ ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये असल्यामुळे भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यात्रा कालावधीत केवळ श्रींचे धार्मिक विधी आणि लसीकरण झालेल्या भाविकांनाच दर्शन घेता येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील विविध विभागांतील अधिकार्यांची बैठक पार पडली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर म्हसवडवासियांनी निषेध फेरी काढून ५ डिसेंबर या दिवशी ‘म्हसवड बंद’ ची हाक दिली आहे.
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार यात्रा पटांगणामध्ये स्थिर राहिल. श्रींच्या रथाभोवती ‘डबल बॅरेगेटींग’ करण्यात येईल. लसीकरण झालेल्या भाविकांची प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून पडताळणी केली जाईल. नंतरच त्यांना रांगेत उभे राहून लांबूनच दर्शन घेता येईल, तसेच यात्रेतील खेळणी, पाळणा, दुकाने, फेरीवाले, हातगाडे आदींना अनुमती नाकारण्यात आली आहे. वाहनांच्या वाहतूक आणि वाहनतळ व्यवस्थापनासाठी पोलीस विभागाचे आवश्यक निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्याचे सर्वांनी पालन करावे. बाहेरगावाहून येणार्या दिंड्या, सासनकाठ्या, पालख्या आदींना मनाई करण्यात आली आहे. मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
म्हसवडवासियांनी निषेध फेरी काढून व्यक्त केला प्रशासनाच्या विरोधात संताप !श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव प्रशासकीय दिरंगाईमुळे ऐनवेळी रहित करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक, म्हसवडकर नागरिक, व्यापारी आदी वर्गातून निषेध फेरी काढून तीव्र संताप व्यक्त केला. निषेध फेरीमध्ये शेकडो भक्तांची उपस्थिती होती. ५ डिसेंबर या दिवशी ‘म्हसवड बंद’ ची हाक देण्यात आली आहे. ‘भाविकांच्या श्रद्धास्थानांची अशी अवहेलना करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही’, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रींच्या रथाला बॅरिगेट्स आणि पत्रे लावून देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थ आणि भक्त यांनी घेतली आहे. या सूत्रावरून म्हसवड नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे द्यावेत, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. |