देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्याकडून कार्यभार काढला !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे पूरग्रस्त महिलांना वाटलेल्या ५ सहस्र साड्यांच्या नोंदी नसल्याचे प्रकरण
असे प्रकार टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्याच कह्यात हवे ! – संपादक
कोल्हापूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१९ मध्ये पूरग्रस्त महिलांना वाटलेल्या २६ लाख ३२ सहस्र रुपयांच्या ५ सहस्र साड्यांच्या कोणत्याच प्रकारच्या नोंदी समितीकडे नसल्याचे नुकतेच समोर आले. याची नोंद घेत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी धनाजी जाधव यांच्याकडून प्रभारी व्यवस्थापक पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. धनाजी जाधव हे देवस्थान व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे महेश जाधव यांचे बंधू आहेत. आता सेवा ज्येष्ठतेनुसार जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांची श्री महालक्ष्मी मंदिराच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापकपद गेल्या १० वर्षांपासून रिक्त असून धनाजी जाधव हे प्रभारी व्यवस्थापक म्हणून कार्यभार पहात होते. महादेव दिंडे यांच्यामुळे आता मंदिरास पूर्णवेळ व्यवस्थापक उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकार्यांनी आता साड्या वाटण्याचे प्रकरण, तसेच देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी झालेली आर्थिक उधळपट्टीचे प्रकरण यांचे सखोल अन्वेषण करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा भाविक व्यक्त करत आहेत.