साहित्यिकांनो, सरस्वतीपुत्र व्हा !
संपादकीय
संतांमधील विनम्रता, प्रीती, वत्सलता हेच त्यांच्या दीर्घकाल टिकलेल्या साहित्याचे मर्म ! – संपादक
कोरोनाच्या संकटामुळे मार्च २०२१ मध्ये होणार्या ९४ व्या साहित्य संमेलनाला अंततः ३ डिसेंबरचा मुहूर्त मिळाला. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिक येथे होणारे हे दुसरे साहित्य संमेलन आहे. यापूर्वी वर्ष १९४२ मध्ये २७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे झाले होते. तब्बल ७९ वर्षांनी पुन्हा या शहरात संमेलन पार पडत आहे; मात्र सध्या समीकरणे पालटली आहेत. या व्यासपिठावरून स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी कुसुमाग्रज, वि.वा. शिरवाडकर, प्र.के. अत्रे, वि.स. खांडेकर आदी कितीतरी प्रतिभावंत साहित्यिकांनी आपल्या उपास्य देवतेला मानवंदना दिली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीत चालू असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनामध्ये विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीचे पूजन डावलण्यात आले. साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी ‘वैज्ञानिक असणारे डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाध्यक्ष असल्याने दीपप्रज्वलन करायचे किंवा कसे ? याविषयी संमेलनाध्यक्षांना विचारून निर्णय घेण्यात येणार’, असे विधान करून बौद्धिक दिवाळखोरीच दाखवून दिली. आज ‘डॉ. जयंत नारळीकर यांच्या सल्ल्याने सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन करायचे कि नाही ?’, असे सांगणार्या आयोजकांनी पुढच्या वर्षी इस्लामी साहित्यिकाला अध्यक्ष म्हणून आणायचे ठरवले आणि ते येणार तर ‘ग्रंथदिंडीत ज्ञानेश्वरी ठेवायची कि नाही ?’, असे त्यांना विचारून ठरवतो’, असे सांगितले तर त्यात नवल वाटायला नको. डॉ. जयंत नारळीकर यांना प्राप्त असलेली प्रतिष्ठा ही विद्येमुळेच आहे. त्या विद्येचे प्रतीक म्हणजेच सरस्वतीदेवता, एवढे तरी आयोजकांच्या लक्षात यायला हवे. सरस्वतीदेवीचे पूजन आयोजकांनी जरी टाळले, तरी तिचे महत्त्व खरा साहित्यिक जाणतो; मात्र यातून आयोजकांची पात्रता महाराष्ट्राला समजली. घरात पाहुणे येणार म्हणून आईला घराबाहेर काढण्याचा हा निंदनीय प्रकार आयोजकांनी केला. आयोजकांनी हा प्रकार संमेलनाचे अध्यक्ष वैज्ञानिक आहेत म्हणून केला कि पुरोगाम्यांच्या जातीयवादी भूमिकेतून केला; हे स्पष्ट केलेले नाही. समस्त साहित्यप्रेमींनी आयोजकांच्या या कृत्याचा निषेध करून त्यांना ही चूक लक्षात आणून द्यायला हवी.
संतांनी गौरवलेली श्री सरस्वतीदेवी !
महाराष्ट्रातील संत परंपरेचा इतिहास जरी आयोजकांनी अभ्यासला असता, तर सरस्वतीपूजन करावे कि न करावे ? हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष महोदयांना विचारण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, मुक्ताई, सावतामाळी, समर्थ रामदासस्वामी, बहिणाबाई या संतरत्नांनी महाराष्ट्राला भरभरून साहित्य दिले. अभंग, भारूडे, पोवाडे, काव्ये आदी गद्य-पद्य या दोन्ही प्रकारांतील हे संतसाहित्य आजही सर्व समाजासाठी दिशादर्शक आहे. महाराष्ट्रात साहित्याचा वारसा संतांकडूनच आला आहे, हे खर्या अर्थाने म्हणावे लागेल. मागील ४-५ वर्षांतील कुणा साहित्यिकांची नावे किती जणांना ठाऊक आहेत ? त्यांची नावेही आठवावी लागतील; परंतु हे संतसाहित्य मात्र महाराष्ट्राच्या घराघरांत आणि मनामनांत पोचले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एकतरी संतसाहित्याचे पुस्तक निश्चितपणे मिळेल. ‘या संतसाहित्यामध्ये गोडवा का आहे ?’, याचे उत्तर म्हणजे या सर्व साहित्याचा केंद्रबिंदू ‘अध्यात्म’ हा आहे. या सर्व संतांनी शारदास्तवनानेच त्यांच्या साहित्याला प्रारंभ केला आहे. समर्थ रामदासस्वामी ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।’, असे म्हणून तिला वंदन करतात, तर संत तुकाराम महाराज तिला ‘माऊली सारजा’ म्हणून तिला आईची उपमा देतात. संत ज्ञानेश्वर तिला ‘वाग्विलासिनी’ म्हणून गौरवतात, तर संत बहिणाबाई तर ‘माझी माय सरसोती, मले शिकवते बोली ।’, अशा ऐरणी भाषेत श्री सरस्वतीदेवीला आईची उपमा देऊन ‘तीच आईप्रमाणे शिकवत आहे’, असे म्हणतात. या थोर संतरत्नांनी जिचा गौरव करून साहित्याला प्रारंभ केला, त्या संत परंपरेचा वारसा सांगणारे ‘कुणाला पटणार नाही’ म्हणून सरस्वतीपूजनच नाकारत असतील, तर हा कर्मदरिद्रीपणा होय.
विनय असल्यामुळे संतांचे साहित्य अजरामर !
‘हिंदूंची देवता’, ‘ब्राह्मणांची देवता’ असा विखारी प्रचार करून काही जात्यंध मंडळी स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणवत आहेत. सरस्वतीपूजनाला विरोध करणे म्हणजे त्यांच्या पुरोगामित्वाचा एक भाग आहे; मात्र या मंडळींनी लक्षात घ्यायला हवे कि, ज्ञान हे जाती, धर्म, पंथ यांच्या पलीकडे आहे. महर्षि व्यास, वाल्मीकि ऋषि हे प्राचीन भारतातील साहित्यिक उच्च कुळातील नसले, तरी त्यांचे साहित्य अजरामर आहे. त्यांनाही श्री सरस्वतीदेवी पूजनीय होती. विद्येच्या उपासनेला जातीयवादामध्ये तोलणे हा ‘कुपमंडूकपणा’ होय. हा कुममंडूकपणा केवळ हिंदूद्वेषापायी चालू आहे. विद्या ही नेहमी विनयाने शोभते. विद्येची देवता सरस्वतीचे पूजन हे ज्ञानी माणसाच्या विनयाचे लक्षण आहे. या विनयाने लिहिलेले साहित्यच अजरामर झाले. संतसाहित्यातून हा बोध स्वत:ला विद्वान आणि साहित्यिक म्हणवणार्यांनी अवश्य घ्यावा. काही पुस्तके लिहिली म्हणजे ‘आम्ही साहित्यिक आहोत’, असे समजणार्यांनी ‘आम्ही लिहिलेल्या साहित्यामधून सर्वसामान्यांना लाभ झाला आहे का ?’, याचा विचार करायला हवा. ‘आम्ही श्रेष्ठ साहित्यिक आहोत’, या भावनेत रहाणारे असे अनेक अहंकारी साहित्यिक पहायला मिळतात. असे अहंकारातून लिहिलेले लिखाण तात्कालीक असते. या उलट संतांचे साहित्य काळाच्या ओघात टिकून रहाते. याचे कारण ते अहंबाधित नाही. संतांमधील विनम्रता, प्रीती, वत्सलता हेच त्यांच्या दीर्घकाल टिकलेल्या साहित्याचे मर्म आहे आणि हे गुण विद्येच्या आराधनानेच प्राप्त होतात. सरस्वतीदेवीची उपासना नाकारून नाशिकमधील साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हा नतद्रष्टपणा केला. ज्याप्रमाणे संतांनी मराठी साहित्य समृद्ध केले, त्याप्रमाणे साहित्यिकांनी श्री सरस्वतीदेवीचे पूजक होऊन मराठी भाषा समृद्ध करावी !