अमली पदार्थांच्या सागरी तस्करीमागे पाकिस्तान ! – अजेंद्र बहादूर सिंह, प्रमुख ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल
नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषद
मुंबई – सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी वाढली असून त्यामागे अफगाणिस्तानात आलेली तालिबानी राजवट हेच कारण आहे. असे असले, तरी त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे नि:संशयपणे लक्षात आले आहे, असे प्रतिपादन भारतीय नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी ४ डिसेंबर या दिवशी येथे केले. नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मकरान किनारपट्टीच्या मार्गाने होणार्या अमली पदार्थांच्या तस्करीत पुष्कळ वाढ झाली आहे. अलीकडे नौदलानेही कारवाई करून काही मोठे साठे कह्यात घेतले आहेत. यातून येणार्या पैशांचा वापर आतंकवादी कारवायांसाठी केला जातो; म्हणूनच त्याला आळा घालण्यासाठी भारतीय नौदलाने कंबर कसली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा आतंकवादाशी थेट संबंध असल्याने नौदलाने टेहळणी वाढवली आहे. त्यासाठी पी-१८ टेहळणी विमानांचा वापर केला जातो.