दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई आणि वितरण सेवा करणार्या साधकांना आलेल्या अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीचे मुद्रण पुणे येथील एका मुद्रणालयात केले जाते. त्या संदर्भात ‘दैनिकाची छपाई आणि त्याचे वितरण करतांना साधकांना आलेल्या अनुभूती, एका साधकाला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना आलेली ध्यानाची अनुभूती अन् एका वाचकाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उपाय होत असल्याची अनुभूती’, अशा विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्री. गिरीश गुडी, पुणे
१. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या छपाईची सेवा देवाला शरण जाऊन पूर्ण केल्यावर येणार्या तांत्रिक अडचणी आपोआप दूर होणे आणि सुगंधाची अनुभूतीही घेता येणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई करतांना मधे मधे तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या सोडवण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आले; पण अडचणी सुटत नव्हत्या. आम्ही संपूर्ण सेवा संघभावाने, तसेच भावपूर्ण आणि देवाला शरण जाऊन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अडचणी आपोआप दूर झाल्या, तसेच दैनिकाच्या माध्यमातून सुगंधाची अनुभूतीही घेता आली. देवाला शरण जाऊन नामजपादी उपाय करणे किंवा संतांनी नामजप करणे अशा उपायांनीही तांत्रिक अडथळे दूर होतात.
२. ‘जिथे दैनिकाची छपाई होते, त्या ठिकाणच्या वातावरणातील चैतन्य वाढले आहे’, असे जाणवते आणि काळ्या शक्तीचे आवरण दूर होऊन हलके वाटते.
३. दैनिकाच्या अंकांवर दैवी कण आढळणे आणि ‘जो सनातनचा झाला, त्याच्यावर देवाची कृपा लगेच होते’, असे वाटणे
नियमितपणे छपाई होऊन येणार्या दैनिकाच्या अंकांवरही मध्यंतरी दैवी कण आढळायचे. दैनिक छापण्यासाठी वापरल्या जाणार्या कागदावरही छपाईपूर्वी दैवी कण आढळून येत होते. या वेळी ‘जो सनातनचा झाला, त्याच्यावर देवाची कृपा लगेच होते’, असे मला वाटले.’
श्री. अमोल शंकर चोथे, पुणे
१. छपाईची सेवा करतांना साधना आणि सेवा यांविषयीच्या विचारांत वाढ होणे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रिय असणार्या दैनिकाची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञता वाटणे
‘प्रतिदिन असणार्या दैनिकाच्या छपाईच्या सेवेच्या माध्यमातून माझी सेवेची तळमळ वाढल्याचे जाणवते. ‘साधना करायची आहे’, हा विचार तीव्र होऊन सेवेलाच प्राधान्य दिले जाते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अतिशय प्रिय अशा दैनिकाची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञता वाटते. ‘सेवा कशी पूर्ण होते’, हे समजतही नाही.
२. प्रतिदिन श्रीकृष्णच छपाईची सेवा करवून घेत असल्याने सेवेसाठी अल्प साधक असतांनाही काळजी न वाटणे
सेवा करतांना प्रतिदिन येणार्या अडचणींतून वर्तमानकाळात रहाता येते. ‘प्रत्येक कृती श्रीकृष्ण, म्हणजे परात्पर गुरुदेवच करवून घेत आहेत, तसेच कितीही अडचणी आल्या, तरी श्रीकृष्ण ती सेवा पूर्ण करवूनच घेतो’, याची अनुभूती येते. प्रतिदिन श्रीकृष्ण सेवा करवून घेत असल्याने सेवेसाठी अल्प साधक असले, तरी काळजी वाटत नाही. सेवा सहजतेने पूर्ण होते.’
श्री. श्रीधर कुसुरकर, पुणे
सेवेला जाण्यापूर्वी मनात नकारात्मक विचार असणे आणि सेवा केल्यावर मन प्रसन्न होणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या छपाईची सेवा रात्री असते. दिवसभर काम, तसेच मनावर आलेल्या आवरणामुळे सेवेला जाण्याविषयी माझ्या मनात नकारात्मक विचार येतात. त्यावर मात करून सेवेला गेल्यानंतर शारीरिक आणि मानसिक ताण एकदम नाहीसा होतो अन् मन अधिक प्रसन्न होते. तसेच ‘छपाई सेवा संपूच नये’, असे वाटते.’
श्री. महेंद्र अहिरे, पुणे
१. सेवेला जाण्यापूर्वी नकारात्मक विचार येणे, सेवेला गेल्यावर उत्साह निर्माण होणे
‘काही वेळा माझ्या मनात ‘सेवेला जाऊ नये’, असे नकारात्मक विचार येतात; पण त्या वेळी साधक अल्प असल्याने सेवेसाठी जावेच लागते. तेव्हा मनाचा संघर्ष होऊन प्रतिक्रिया येत असत; पण मुद्रणालयात पोचताच मला तेथील चैतन्यामुळे पुष्कळ उत्साह जाणवत असे. मी नोकरी करून थकलेला असलो, तरी माझा दिवसभरातील थकवा जाऊन मला वेगळाच उत्साह जाणवत असे. मनातील नकारात्मक विचार अल्प होऊन मन सकारात्मक होत असे. त्यामुळे मला कृतज्ञता वाटायची.
२. साधकसंख्या अल्प असल्यास मुद्रणालयातील कामगारांनी साहाय्य करणे आणि देवच अडचणी सोडवत असल्याचे अनुभवता येणे
काही वेळा साधकांना सेवेला येण्यास अडचण यायची. तेव्हाही दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई वेळेच्या आधी विनाअडथळा पूर्ण होत असे. मुद्रणालयातील कामगारही आम्हाला साहाय्य करायचे. तेव्हा ‘देवालाच त्याच्या कार्याची काळजी असून तोच सर्व अडचणी सोडवत आहे’, हे अनुभवता यायचे.
३. ‘सनातन प्रभात’मधील सात्त्विकता आणि चैतन्य यांमुळे मुद्रणालयातील कामगारांमध्ये परिवर्तन होणे
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सात्त्विकता आणि चैतन्य यांमुळे मुद्रणालयातील कामगारांमध्ये परिवर्तन झाले. कामगार सनातनच्या साधकांना ‘दादा’ असे संबोधतात. ते सर्व साधकांशी नम्रतेने बोलतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ला ‘देवाचा पेपर’, असे संबोधतात. एखादे नवीन यंत्र मुद्रणालयात आणल्यानंतर पहिली छपाई ‘देवाच्या पेपर’ने, म्हणजे ‘सनातन प्रभात’ने करूनच यंत्र चालू करतात.’
श्री. हर्षद ढमाले, सांगली
१. रात्री झोपण्यास विलंब होऊनही दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेवर कोणताही परिणाम न होणे
‘मी महाविद्यालयात शिकत असतांना माझ्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा होती. सकाळी ६ वाजता सेवेला प्रारंभ करून त्यानंतर मी महाविद्यालयात जायचो. कधी कधी रात्री झोपण्यास विलंब झाला, तरी देवाच्या कृपेने त्याचा सेवेवर परिणाम कधीच झाला नाही. त्यानंतर अन्य जिल्ह्यांचे गठ्ठे ठेवण्याची पहाटे ३.३० ते ४ च्या कालावधीत मला बसस्थानकात जावे लागायचे. पहाटे उठण्यासाठी मी गजर लावत असे; पण अनेक वेळा ‘गजर वाजण्यापूर्वीच मला कोणीतरी हलवून उठवत आहे’, असे मला जाणवायचे आणि मला लगेच जाग यायची.
२. बसस्थानकात पहाटेच्या वेळी एक कुत्रा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गठ्ठ्यांचे रक्षण करण्यासाठीच येत आहे’, असे जाणवणे
मी पहाटे ४ वाजता बसस्थानकात ‘सनातन प्रभात’च्या गठ्ठ्यांची सेवा करायचो. तेव्हा पहाटे ४ ते ५.३० या कालावधीत एक कुत्रा तेथे येऊन बसत असे. ‘तो ‘सनातन प्रभात’च्या गठ्ठ्यांचे रक्षण करण्यासाठीच येत आहे’, असे मला जाणवायचे.
बसस्थानकातील इतर कुत्रे तेथे नियमित येणार्या लोकांवर भुंकायचे; मात्र जवळपास रहाणारे सनातनचे साधक बसस्थानकात गठ्ठे नेण्यासाठी यायचे, तेव्हा कुत्रे त्यांच्यावर कधीच भुंकले नाहीत.’
श्री रवींद्र अंबीलवादे, अंबड, जिल्हा जालना.
दैनिकाचा गठ्ठा हातात घेतल्यावरच उत्साह वाटणे
‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना ‘कधीही माझी गाडी बंद पडली नाही किंवा कधीही आळसामुळे मी उशिरा उठलो’, असे झाले नाही. दैनिक वितरण करून आल्यावर वेगळाच उत्साह जाणवतो. प्रतिकूल स्थिती असली, तरीही मन स्थिर असते. दैनिक ‘सनातन प्रभात’च गठ्ठा हातात घेतल्यावरच उत्साह वाटतो.’
श्री. तुषार प्रकाश भोसकर, संभाजीनगर
दैनिकाचे वितरण करू लागल्यावर सकारात्मकता वाढणे
‘मला पूर्वी पुष्कळ राग येत असे. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करू लागल्यापासून माझ्यात पालट होऊन माझ्यातील सकारात्मकता वाढली आहे. आर्थिक, तसेच घरगुती अडचणी यांत पालट होऊन मी आनंदी आणि समाधानी आहे. परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येते.’
श्री. हेमंत शिंदे, पुणे
दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना मन निर्विचार होऊन ध्यान लागणे आणि मनाची शांत अवस्था ४ घंटे टिकणे
‘ऑक्टोबर २०२१ मध्ये एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यास आरंभ केल्यानंतर माझ्या मनातील विचार एकदम थांबले. आपोआपच माझे डोळे मिटले गेले आणि साधारण एक मिनिट ध्यान लागले. माझा नामजप एका लयीमध्ये चालू होऊन मन एकदम शांत झाले आणि परात्पर गुरुदेवांची आठवण आली. माझ्याकडून सेवेत होणार्या चुकांसाठी तळमळीने क्षमायाचना आणि नंतर प्रार्थना झाली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले दैनिकातील चुका दुरुस्त करून त्यातील चैतन्य वाढण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमुळेच ही अनुभूती आली’, असे वाटले. साधारणतः ४ घंटे मनाची शांत अवस्था टिकून होती.’
(‘परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या काही मासांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये होणार्या विविध प्रकारच्या चुका संबंधित साधकांना प्रतिदिन लक्षात आणून देत आहेत.’ – संकलक)
(सर्व सूत्रांचा दिनांक ३०.११.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |