सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

आजच्या लेखात आपण सामासिक शब्द लिहिण्याची पद्धतीच्या पुढच्या भागाविषयी जाणून घेऊ.

(लेखांक ६ – भाग ५)

१०. सामासिक शब्द लिहिण्याची पद्धत

कु. सुप्रिया नवरंगे

१० आ. कवीराज : या सामासिक शब्दात ‘कवी’ आणि ‘राज’ असे दोन शब्द आहेत. यांतील ‘कवी’ हा तत्सम शब्द आहे. संस्कृतमध्ये हा शब्द ‘कवि’ असा र्‍हस्वांत (ज्या शब्दाचे शेवटचे अक्षर र्‍हस्व असते, असा) लिहिला जातो; परंतु मराठीत आपण हा शब्द ‘कवी’ असा दीर्घांत (ज्या शब्दाचे शेवटचे अक्षर दीर्घ असते, असा) लिहितो. त्यामुळे ‘कवीराज’ असा सामासिक शब्द लिहितांना त्यातील ‘वी’ दीर्घ लिहावा.

१० आ १. नियम – सामासिक शब्दातील पहिला शब्द तत्सम (संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला) आणि र्‍हस्व इ-कारांत किंवा उ-कारांत असेल, तर समास होतांना त्यातील शेवटचे ई-कार किंवा ऊ-कार दीर्घ लिहावेत !

१० आ २. मराठी व्याकरण सुलभ होण्यासाठी या नियमात संस्कृत-मराठी भेद काढण्यात आला असणे : या नियमाच्या वापरामुळे सनातनचे व्याकरण प्रचलित मराठी व्याकरणापेक्षा वेगळे होते. प्रचलित मराठीत संस्कृत व्याकरणाप्रमाणे ‘कविराज’ असे लिहिले जाते आणि त्यातील ‘वि’ मूळ संस्कृतमध्ये र्‍हस्व असल्यामुळे र्‍हस्व लिहिला जातो; मात्र असे केल्यामुळे मराठीत सामासिक शब्द लिहितांना लिहिणार्‍याला प्रत्येक वेळी ‘त्यातील पहिला शब्द संस्कृत आहे कि मराठी ?’, याचा विचार करावा लागेल. त्याअनुषंगाने आधी ‘मराठीतील संस्कृत शब्द
कोणते ?’, याचा अभ्यास करावा लागेल. हे बर्‍याच जणांना किचकट वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सामासिक शब्दातील पहिला शब्द संस्कृत भाषेत र्‍हस्व असला, तरी मराठीच्या व्याकरणाप्रमाणे दीर्घ लिहिण्याचे निश्चित केले आहे.

१० आ ३. या नियमाची आणखी काही उदाहरणे आणि ती सुलभतेने कळण्यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.


१० आ ४. या नियमाला अपवाद असणारे काही शब्द

१० आ ४ अ. मनुस्मृति : या सामासिक शब्दात ‘मनु’ आणि ‘स्मृति’ हे दोन शब्द आहेत. या पूर्ण शब्दाची फोड ‘मनु यांनी लिहिलेली स्मृति’, अशी होते. यातील ‘मनु’ या पहिल्या शब्दातील ‘नु’ हे अक्षर संस्कृत भाषेमध्ये र्‍हस्व आहे. मराठी व्याकरणाच्या एका नियमाप्रमाणे ते मराठीत ‘नू’ असे दीर्घ लिहावयास हवे; पण आपला एक नियम असाही आहे की, ‘मनु’ हे देवतास्वरूप असल्याने त्यांच्या चैतन्याचा लिहिणार्‍यास आणि वाचणार्‍यास लाभ व्हावा, यासाठी त्यातील ‘नु’ मूळ संस्कृतप्रमाणे र्‍हस्व लिहावा.’ या नियमानुसार या सामासिक शब्दातील ‘नु’ हे अक्षर र्‍हस्व लिहावे. या प्रकारच्या सामासिक शब्दांतील केवळ पहिला शब्दच नव्हे, तर पूर्णच शब्द संस्कृत व्याकरणानुसार लिहावा.

१० आ ४ अ १. नियम – संस्कृत धर्मग्रंथांची नावे ही लिहिणार्‍यास आणि वाचणार्‍यास चैतन्य प्रदान करत असल्यामुळे त्यांना मराठी व्याकरणाचे नियम न लावता ती मूळ संस्कृतनुसार लिहावीत !

१० आ ४ अ २. या नियमाची आणखी काही उदाहरणे आणि त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.


(समाप्त)

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)