गुरुग्राम (हरियाणा) येथे हिंदूंकडून सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला पुन्हा विरोध

२० जण पोलिसांच्या कह्यात !

हरियाणात भाजपचे सरकार असतांना हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला सातत्याने विरोध करावा लागतो, तसेच पोलीस आणि प्रशासन त्याची नोंद घेऊन ते थांबवत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक 

आंदोलनकारी हिंदूंना अटक करताना पोलीस

गुरुग्राम (हरियाणा) – येथे सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणार्‍या नमाजपठणाला हिंदूंनी ३ डिसेंबर या दिवशी पुन्हा विरोध केला. यावर पोलिसांनी २० जणांना कह्यात घेतले. गेल्या काही आठवड्यांपासून येथील सेक्टर ३७ मध्ये सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला सातत्याने विरोध होत आहे. गुरुग्राम शहरात पोलिसांकडून मुसलमानांना २० ठिकाणी नमाजपठण करण्यास अनुमती देण्यात आली असून त्यास हिंदू अन् त्यांच्या संघटना यांचा विरोध आहे. मागील आठवड्यात सेक्टर ३७ येथे हिंदूंनी नमाजपठण केल्या जाणार्‍या ठिकाणी हवन केले होते. त्यामुळे येथून थोड्या अंतरावर एका कोपर्‍यात नमाजपठण करण्यात आले होते. तेव्हा ‘जय श्रीराम’च्या घोषणाही देण्यात आल्या होत्या. प्रत्येक शुक्रवारी, म्हणजे नमाजाच्या दिवशी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो.