परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर, तसेच खोलीच्या छतावर पडलेल्या डागांच्या संदर्भात केलेले संशोधन !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
संतांच्या खोलीविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. या कार्यात अडथळे आणण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांवर सतत आक्रमण करतात. गत २० वर्षांपासून चालू असलेला हा ‘देवासुर लढा’ आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. या सूक्ष्मातील युद्धाचे पडसाद वेळोवेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत उमटले आहेत. ‘कलियुगातील ‘देवासुर लढा’ कसा चालतो ?’, हे समाजाला, तसेच पुढील पिढ्यांनाही समजावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी अत्यंत जिज्ञासेने अन् अभ्यासपूर्वक सदर गोष्टींची त्या त्या वेळी छायाचित्रे काढण्यास सांगितली होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर, तसेच खोलीच्या छतावर पडलेल्या डागांच्या निवडक छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर पडलेले डाग (टीप १), तसेच खोलीच्या दक्षिणेकडील छतावर पडलेले डाग (टीप २) यांची वर्ष २०२१ मध्ये छायाचित्रे काढण्यात आली. याच डागांची वर्ष २०१३ मध्येही छायाचित्रे काढण्यात आली होती. या छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या छायाचित्रांच्या तुलनात्मक अभ्यासातून लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर पडलेल्या डागांमध्ये विविध तोंडवळे दिसतात. वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रामध्ये भिंतीवरील डाग अधिक सुस्पष्ट दिसतात.
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या दक्षिणेकडील छतावर पडलेल्या डागांच्या वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रातील डागांचे प्रमाण न्यून आणि अस्पष्ट झाले आहे. |
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर, तसेच खोलीच्या छतावर पडलेल्या डागांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे : या छायाचित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नव्हती. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा होती, हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. दक्षिण दिशेकडील भिंतीवर पडलेल्या डागांच्या वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रामध्ये अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळले.
२. खोलीच्या छतावर पडलेल्या डागांच्या वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रामध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. दक्षिण दिशेकडील भिंतीवरील डागांच्या वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रामध्ये अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असणे : ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले जिवंत रहाणे अत्यंत आवश्यक आहे’, असे अध्यात्मातील जाणकारांनी सांगितले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे या सूक्ष्मातील युद्धाचे केंद्रबिंदू आहेत. या सूक्ष्मातील युद्धाचे पडसाद वेळोवेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत उमटले आहेत. त्यांच्या खोलीतील दक्षिण दिशेकडील भिंतीवर पडलेले डाग हे सामान्य नसून मोठ्या वाईट शक्तींनी दक्षिण दिशेकडून परात्पर गुरु डॉक्टरांवर सोडलेल्या त्रासदायक शक्तीच्या आघातामुळे निर्माण झालेले आहेत. वर्ष २०१३ च्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये भिंतीवरील डाग अधिक सुस्पष्ट दिसू लागले आहेत. (बाजूची छायाचित्रे पहावीत.) भिंतीवरील डागांच्या दोन्ही छायाचित्रांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात आढळून आल्या. वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या (त्याच डागांच्या) छायाचित्रामध्ये अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. याचे कारण म्हणजे वर्ष २०२१ मध्ये सूक्ष्मातील युद्ध अंतिम टप्प्यात पोचले असून वाईट शक्तींची शक्ती आधीच्या तुलनेत पुष्कळ न्यून झाल्याने त्या आता सगुण स्तरावर त्वेषाने लढत आहेत. आता या सूक्ष्मयुद्धाचा स्तर निर्गुणाकडून सगुणाकडे चालला आहे. सूक्ष्मयुद्धाचा स्तर निर्गुणाकडून सगुणाकडे जाणे, हे स्थुलातील आपत्काळास प्रारंभ झाल्याचे द्योतक आहे.
२ आ. खोलीच्या छतावरील डागांच्या वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रामध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असणे : देवासुर लढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे धर्माच्या बाजूने लढणार्यांना ईश्वराची कृपा आणि साहाय्य आपोआप लाभते. ज्या वेळी वाईट शक्ती त्वेषाने परात्पर गुरु डॉक्टरांवर आक्रमण करतात, त्या वेळी ईश्वर विविध माध्यमांतून परात्पर गुरु डॉक्टरांचे लीलया रक्षण करतो, उदा. सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात करण्यात येणारे यज्ञयाग असो की, काही संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय असो की, परात्पर गुरु डॉक्टरांची चैतन्यमय खोली असो, या सर्व माध्यमांतून ईश्वराने प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचे रक्षण केलेले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या दक्षिण प्रभागातील छतावर पडलेल्या डागांच्या वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रातील डाग न्यून आणि अस्पष्ट झाल्याचे दिसून येते. याचे कारण हे की, परात्पर गुरु डॉक्टरांवर वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्यमय खोलीतील ईश्वरी चैतन्य वेळोवेळी कार्यरत झाल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे निर्माण झालेल्या डागांचे प्रमाणही हळूहळू अल्प झाले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले आध्यात्मिक संशोधन पुढील अनेक पिढ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणे
थोडक्यात या संशोधनातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आक्रमणांचा होणारा परिणाम स्थुलातून त्यांच्या खोलीतील भिंतीसारख्या निर्जीव वस्तूंवर कशा प्रकारे प्रतिबिंबित होतो, तसेच सूक्ष्मयुद्धाचा स्तर जसजसा पालटतो, त्यानुसार ते पालट भिंतीवर स्थुलातून कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात’, हे लक्षात येते. परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून घडणार्या घटनांचा सखोल अभ्यास करता यावा, यासाठी त्या घटनांची छायाचित्रे काढणे, त्यांचे ध्वनीचित्रीकरण करणे, तसेच त्या घटनांचे सूक्ष्म परीक्षण करणे आणि वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करणे अशा विविधांगी सेवा शिकवून साधकांना सिद्ध (तयार) केले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले गत ३० वर्षांपासून करत असलेले हे विविधांगी आध्यात्मिक संशोधन पुढील अनेक पिढ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !’ (१९.५.२०२१)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
ई-मेल : mav.research2014@gmail.com
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |