पाकमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून श्रीलंकेच्या नागरिकाला जिवंत जाळले !
१०० हून अधिक जणांना अटक
|
सियालकोट (पाकिस्तान) – येथे ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून धर्मांधांच्या जमावाने श्रीलंकेच्या प्रियांथा कुमारा या नागरिकाचे हात-पाय तोडून जाळल्याची घटना ३ डिसेंबर या दिवशी घडली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, तसेच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १०० जणांना अटक केली आहे. प्रियांथा कुमारा सियालकोटच्या वजिराबाद रोडस्थित एका खासगी कारखान्यात निर्यात व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. या प्रकरणी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चौकशीची मागणी केली आहे, तर ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने स्वतंत्र अन्वेषणाचा आग्रह धरला आहे. पाकमध्ये वर्ष १९९० पासून आतापर्यंत धर्मांधांच्या जमावाने ईशनिंदेचा आरोपावरून ७० हून अधिक लोकांची हत्या केली आहे.
Islamist mob kills Sri Lankan manager in Pakistan accusing him of blasphemy, manager worked for company that made T20 gears for Pak cricket teamhttps://t.co/je80AVHrsu
— OpIndia.com (@OpIndia_com) December 4, 2021
१. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांथा यांनी ईशनिंदा केल्याच्या अफवा त्यांच्या कारखान्यात सकाळपासून पसरवल्या जात होत्या. अत्यंत गतीने ही अफवा संपूर्ण कारखान्यात पसरली. याचा निषेध म्हणून कर्मचार्यांनी कारखान्याच्या बाहेर निदर्शनेही केली. या वेळी मोठ्या संख्येत लोक कारख्यान्यात घुसले आणि त्यांनी प्रियांथा यांना मारहाण करून त्यांचे हात-पाय तोडले आणि त्यांना जिवंत जाळले.
२. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोचेपर्यंत प्रियांथा यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. पोलिसांची संख्या तोकडी असल्याने आणि जमाव मोठा असल्याने प्रियांथा यांना साहाय्य करण्यास विलंब झाला. पोलिसांनी प्रियांथा यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु गर्दीसमोर तो अयशस्वी ठरला.
३. पाकिस्तानसाठी हा लाजिरवाणा दिवस आहे. मी स्वत: या घटनेच्या चौकशीवर लक्ष ठेवून आहे. या घटनेसाठी उत्तरदायी असणार्या व्यक्तींना शिक्षा दिली जाईल. या प्रकरणी दोषींना अटकही करण्यात येत आहे’, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. (पाकिस्तान हा देशच संपूर्ण जगासाठी लाजीरवाणा ठरला आहे. पाकला आता ‘आतंकवादी’ आणि ‘धर्मांध’ देश घोषित करून त्याच्यावर जगाने बहिष्कार घातला पाहिजे ! – संपादक)
ईशनिंदा म्हणजे काय ?
ईशनिंदा म्हणजे ईश्वराची निंदा. यामध्ये जाणीवपूर्वक पूजास्थानाला हानी पोचवणे, धार्मिक कार्यात बाधा आणणे, धार्मिक भावनांचा अवमान करणे आदींचा समावेश आहे. जगातील अनेक देशांमध्ये ईशनिंदेविषयी कायदे आहेत. यानुसार कठोर शिक्षेचेही प्रावधान आहे. जगातील २६ टक्के देशांमध्ये असा कायदा आहे. यातील ७० टक्के इस्लामी देश आहेत. पाकमध्ये या कायद्यानुसार इस्लाम किंवा महंमद पैगंबर यांच्या विरोधात काहीही बोलणे किंवा कृती केली, तर त्याला फाशीची शिक्षा आहे. जर फाशी देण्यात येणार नसेल, तर दंडासह जन्मठेपेची शिक्षा आहे. हा कायदा इंग्रजांच्या काळात करण्यात आला होता.