‘गुरुमाऊलीच साधकांची क्षणोक्षणी काळजी घेतात’, याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती
१. गाडीला अपघात होऊन डोक्याला मार लागणे, जखमेतून पुष्कळ रक्तवहाणे आणि मलमपट्टी करतांना अन् टाके घालतांना गुरुकृपेने मुळीच न दुखणे
‘मी ‘सिंदी’ (जिल्हा वर्धा) या गावात जाऊन सत्संग घेऊन ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वार्षिक वर्गणीदार बनवण्याची सेवा करते. जानेवारी २०२० मध्ये मी ही सेवा करून एका साधकाच्या समवेत दुचाकीने वर्ध्याला जायला निघाले. तेव्हा माझी गाडी अकस्मात् उसळली आणि मी महामार्गावर पडले अन् माझी गाडी पुढे गेली. त्या वेळी दुसर्या दुचाकीवर असलेला माझ्या समवेतचा साधक येईपर्यंत मला दोन अनोळखी व्यक्तींनी लहान मुलासारखे उचलले. ‘माझ्या डोक्याला मार लागला आहे’, हे मला कळले नाही; कारण मला मुळीच वेदना होत नव्हत्या. त्या दोन व्यक्तींनी मला माझ्या समवेतच्या साधकाच्या गाडीवर बसवले. थोड्या वेळाने ‘माझ्या डोक्यातून रक्त वहात आहे’, हे माझ्या लक्षात आले. वर्ध्याला रुग्णालयात गेल्यावर मला लागलेला मार पाहून आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुम्ही या स्थितीत २० कि.मी. कशा आलात ? मी तुमच्यावर येथे उपचार करू शकत नाही; कारण माझ्याकडे भूल देण्याचे औषध नाही, तरी तुम्ही सेवाग्राम रुग्णालयात भरती व्हा.’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला भूल न देता जे काही करायचे आहे, ते करा.’’ (त्या वेळी मी स्वतःकडे बघितले, तर मी पूर्ण रक्ताने भरले होते.) आधुनिक वैद्यांनी माझ्या डोक्याला ८ टाके घातले, तरी मला मुळीच दुखले नाही. मलमपट्टी (ड्रेसिंग) करतांना त्यांनी डोक्याची कातडी उचलून कापसाने जखम स्वच्छ केली, तरी मला वेदना जाणवल्या नाहीत. तेव्हा आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘तुम्हाला दुखत नाही’, हे मोठे आश्चर्यच आहे !’’ एरव्ही साधा काटा रुतला, तरी मला दुखते; परंतु या वेळी ‘माझी काळजी घेणारी माझी गुरुमाऊली होती आणि त्यांनीच माझ्या वेदना स्वतःवर घेतल्या होत्या’, असे माझ्या लक्षात आले.
२. वरणात मीठ घालण्यासाठी कूकरपासून बाजूला गेल्यावर कूकरचे झाकण उडून बाजूला पडणे आणि त्या वेळी अपघात होण्यापासून वाचणे
एकदा मी स्वयंपाक करत असतांना कूकरचे झाकण उघडून वरणाचे भांडे बाहेर काढले आणि कूकरला पुन्हा झाकण लावले. मी इतर वेळी प्रथम वरण पातळ करायला ठेवते आणि नंतर मीठ घालते; परंतु आज मला ‘वरणात प्रथम मीठ घालावे’, असे वाटले; म्हणून मी मीठ घ्यायला थोडी बाजूला झाले आणि मोठा आवाज झाला. त्या वेळी कूकरचे झाकण उडून बाजूला पडले. मी जर मीठ घेण्यासाठी गेले नसते, तर ते झाकण माझ्या डोक्यावर पडले असते. तेव्हा ‘गुरुमाऊलीच साधकांची क्षणोक्षणी काळजी घेतात’, याची मला जाणीव झाली.
‘गुरुदेवा, ‘तुम्हीच मला अपघातातून वाचवले आहे’, त्याबद्दल तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. जयश्री विजय क्षीरसागर, वर्धा (२९.१.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |