सर्वच कामगारांचे निलंबन करा ! – सातारा एस्.टी. कर्मचार्यांची मागणी
सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) – एस्.टी.च्या विलिनीकरणासाठी काही कर्मचार्यांनी बलीदान दिले आहे. सातारा आगारात ४ सहस्र कर्मचारी आहेत. त्यातील १९२ कर्मचार्यांना निलंबित केले आहे. प्रशासनाने मोजक्या कर्मचार्यांना निलंबित करणे हा आमच्यावरील अन्याय आहे. एखाद्या कर्मचार्याने नैराश्येतून काही बरे-वाईट करून घेतल्यास त्यासाठी सातारा आगारप्रमुख उत्तरदायी रहातील. त्यामुळे करायचेच असेल, तर आंदोलनामध्ये सहभागी सर्वच कर्मचार्यांचे निलंबन करा, अशी मागणी सातारा आगारातील एस्.टी. कर्मचार्यांनी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विलीनीकरणाचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या समितीसमोर आहे. समितीचा निर्णय सरकारला बंधनकारक आहे. इतर मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे कामगारांनी कामावर रुजू व्हावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी चेतावणी सरकारने दिली आहे. आतापर्यंत सहस्रो कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. १ मास चाललेला संप आणि निलंबनाची भीती यांमुळे काही कर्मचारी कामावर परतण्याच्या विचारात आहेत. सातारा आगारातही काही कर्मचारी कामावर येत आहेत. त्यांना थोपवण्यासाठी संपावर ठाम असलेल्या कर्मचार्यांनी कडक पवित्रा घेत सर्वच कर्मचार्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.