ग्रामपंचायतीने वीजदेयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे किल्ले सदाशिव गडावरील सदाशिव मंदिर अंधारात !

वीजपुरवठा पूर्ववत् करण्याची शिवभक्तांकडून मागणी

शिवभक्तांना अशी मागणी का करावी लागते ? ग्रामपंचायतीने शिवभक्तांची अडचण लक्षात घेऊन वीजदेयक लवकरात लवकर भरावे, ही अपेक्षा ! – संपादक

सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) – किल्ले सदाशिव गडावरील वीजदेयक हे हजारमाची ग्रामपंचायत भरते; मात्र डिसेंबर २०१९ पासून मंदिराचे वीजदेयक थकले आहे. ३ मासांपूर्वी कारवाई केल्यानंतर हजारमाची ग्रामपंचायतीने १५ सहस्र रुपये भरले होते. तेव्हा वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात आला होता; मात्र उर्वरित रक्कम अद्याप थकीत असल्यामुळे २२ नोव्हेंबर या दिवशी वीजवितरणने पुन्हा मंदिराचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने वीजदेयक भरून वीजपुरवठा पूर्ववत् करावा, अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले सदाशिव गड येथे सदाशिवाचे प्राचीन मंदिर आहे. हे शिवमंदिर सहस्रो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक सोमवारी सदाशिवाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून शिवभक्त येतात, तसेच रविवारी काही भाविक गडावर मुक्कामी येतात. या भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.