पुणे येथे नानासाहेब पेशवे यांच्या जन्मत्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त पेशवे यांची मूर्ती आणि पवित्र जलकलश पूजन !
पुणे – श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समितीच्या वतीने पेशवे यांच्या जन्मत्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त शनिवारवाड्यावर १ डिसेंबर या दिवशी सकाळी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी पेशवे यांच्या मूर्तीचे आणि रायगड, वढू, रावेरखेडी, थेऊर, वानवडी येथील महापुरुषांच्या समाधीस्थानावरील पवित्र जलकलशाचे पूजन केले. श्रीमंत नानासाहेबांनी वर्ष १७५२ मध्ये सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांना भेट दिलेल्या तलवारीचीही या वेळी विविध सरदारांच्या वंशजांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी मनोगतात श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा मराठ्यांच्या इतिहासातील कार्याचा प्रवास उलगडला.
सरदार गंधे यांचे वंशज योगेश्वर गंधे यांनी सांगितले की, वर्ष १७५२ मध्ये मराठे आणि मोगल यांच्यात अहमदिया करार झाला. देहलीच्या बादशहाच्या संरक्षणासाठी मराठी फौजा पाठवण्यात आल्या. त्या फौजेचे सेनापती सरदार अंताजी माणकेश्वर गंधे होते. त्या वेळी त्यांना नानासाहेब पेशव्यांनी धोप प्रकारातील तलवार भेट दिली. आमची नववी पिढी तलवारीचे जतन करीत आहे.
सौजन्य : zee २४ तास