मार्गशीर्ष मासातील (५.१२.२०२१ ते ११.१२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘५.१२.२०२१ दिवसापासून मार्गशीर्ष मास प्रारंभ होत आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास आणि शुक्ल पक्ष चालू होत आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. देवदीपावली : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेला देवदीपावलीचा कुलधर्म करतात. या दिवशी आपल्या कुलदेवतेला अभिषेक करून नैवेद्य दाखवला जातो. देवदिवाळीचा कुलधर्म मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेला करणे शक्य न झाल्यास तो मार्गशीर्ष मासात कोणत्याही दिवशी करता येतो. ५.१२.२०२१ या दिवशी देवदीपावली आहे.
२ आ. मार्तंड भैरव (मल्हारी खंडोबा) उत्सव, षड्रात्रोत्सवारंभ : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत मार्तंड भैरवाचा (मल्हारी खंडोबाचा) उत्सव असतो. या ६ दिवसांच्या उत्सवाला ‘षड्रात्रोत्सव’, ‘खंडोबाचे नवरात्र’ किंवा ‘सटीचे नवरात्र’, असेही म्हणतात. पहिल्या दिवशी देव खंडोबाची स्थापना करून त्याची पूजा करतात. ६ दिवस अखंड नंदादीप लावतात. पहिल्या दिवशी फुलांची एक माळ, दुसर्या दिवशी दोन, अशा क्रमाने वाढवत जाऊन सहाव्या दिवशी सहा माळा घालतात. प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून आरती करतात. तबकातील नारळ खंडोबावरून ओवाळून फोडल्यावर त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. सहाव्या दिवशी भरीत-रोडग्याचा आणि कांद्याच्या पातीचा नैवेद्य असतो. त्या दिवशी खंडोबापुढे गोंधळ घालतात.
२ इ. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे प्रथम दर्शन ‘चंद्रकोर’ रूपात होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. ५.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.१० पर्यंत चंद्रदर्शन आहे.
२ ई. मृत्यूयोग : रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी आश्लेषा आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘मृत्यूयोग’ होतो. हा योग प्रयाणास किंवा कोणत्याही शुभ कार्यास वर्ज्य करावा. सोमवार, ६.१२.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.१९ पासून उत्तराषाढा नक्षत्र असल्याने मंगळवारी सूर्याेदयापर्यंत मृत्यूयोग आहे.
२ उ. विनायक चतुर्थी (अंगारकयोग) : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या दिवशी श्री विनायक (गणेश) व्रत करतात. मंगळवार आणि चतुर्थी तिथी एकत्र आल्यावर ‘अंगारकयोग’ होतो. या दिवशी श्री विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा आणि श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात. मंगळवार, ७.१२.२०२१ या दिवशी विनायक चतुर्थी आहे.
२ ऊ. दग्धयोग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे.
१. ७.१२.२०२१ या दिवशी मंगळवार असून रात्री ११.४१ पासून पंचमी तिथी असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्धयोग’ आहे.
२. ९.१२.२०२१ या दिवशी गुरुवार असून सूर्याेदयापासून सायंकाळी ७.५५ पर्यंत षष्ठी तिथी असल्याने ‘दग्धयोग’ आहे.
३. १०.१२.२०२१ या दिवशी शुक्रवार असून सायंकाळी ७.१० पासून अष्टमी तिथी असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्धयोग’ आहे.
४. ११.१२.२०२१ या दिवशी शनिवार असून सायंकाळी ७.१३ पासून नवमी तिथी असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्धयोग’ आहे.
२ ए. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. ७.१२.२०२१ या दिवशी दुपारी १.०३ पासून रात्री ११.४१ पर्यंत आणि १०.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.१० पासून ११.१२.२०२१ या दिवशी सकाळी ७.०६ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ऐ. नागपूजन-नागदिवे : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमीला नागपूजन करून दिवे लावतात. या दिवशी स्नानदानादी पुण्यकृत्ये करून नागदेवतेची कृपा संपादन करावयाची असते. ‘नागपूजनासाठी पंचमी तिथी सूर्याेदयानंतर न्यूनतम ६ घटी (२ घंटे २४ मिनिटे) असावी’, असा सर्वसाधारण नियम असतो. ८.१२.२०२१ या दिवशी नागपूजन करावे, तसेच नवनागस्तोत्र वाचावे.
२ ओ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ८.१२.२०२१ या दिवशी रात्री १०.४० पासून ९.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.५५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ औ. चंपाषष्ठी, स्कंद षष्ठी : मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला ‘चंपाषष्ठी’ आणि ‘स्कंद षष्ठी’ अशी नावे आहेत. भगवान कार्तिकेय (भगवान स्कंद) यांना ‘चंपा’ हे फूल प्रिय असल्याने या तिथीला ‘चंपाषष्ठी’ म्हणतात. चंपाषष्ठी सूर्याेदयानंतर ६ घटींपेक्षा जास्त (२ घंटे २४ मिनिटे) आणि अन्य काही योगांनी युक्त पाहिजे. स्कंद षष्ठी हे व्रत प्रामुख्याने दक्षिण भारतात केले जाते. स्कंद षष्ठीला भगवान शंकराचे ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय (भगवान स्कंद) यांचे पूजन करतात. हे व्रत केल्याने भक्तांचे दुःख दूर होते आणि त्यांना सुख अन् समृद्धी प्राप्त होते, तसेच जीवनात आनंद टिकून रहातो.
२ अं. मार्तंड भैरवोत्थापन : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून चालू झालेल्या मार्तंड भैरव उत्सवाची समाप्ती या षष्ठी तिथीच्या दिवशी होते. भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मणि आणि मल्ल या राक्षसांना मारून जनतेला संकटातून मुक्त केले. या आनंदप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाचा अवतार असणार्या खंडोबादेवाचे पूजन करतात. हा सण महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील प्रमुख सण आहे.
२ क. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. दुष्प्रत्तींचा शक्तींचा नाश होऊन भयमुक्त होण्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी दुर्गासप्तशतीस्तोत्र, कवच, अर्गलास्तोत्र आदी देवीस्तोत्रांचे वाचन करतात. ११.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.१३ पर्यंत अष्टमी तिथी आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.११.२०२१)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – क्षयदिन, दग्धयोग, भद्रा (विष्टी करण), घबाड मुहूर्त आणि दुर्गाष्टमी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ |