आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजप सोडून गेले नाहीत, हा त्यांचा मोठेपणा आणि आमचे यश ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गत २ वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. अनेकवेळा ते पक्ष सोडून जातील अशी आवई उठवली गेली; मात्र ते पक्ष सोडून गेले नाहीत, हा त्यांचा मोठपणा आहे आणि आमचे यश आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
जावळी तालुक्यातील आंबेघर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानदेव रांजणे यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी पक्षांचे नेते, जिल्हा परिषद सदस्या, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘दादागिरीविरोधात संघर्ष करणार्या कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. मग तो कोणत्याही पक्षाचा असो ! अगदी समाजवादी पक्षाचा असला, तरी आम्ही त्याच्या सत्काराला जाणारच ! रांजणे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या आणि विद्यमान आमदाराच्या दादागिरीला न जुमानता धैर्याने संघर्ष केला. त्यांचे कौतूक करण्यासाठीच मी आलो आहे.’’