शी जिनपिंग यांना आयुष्यभर चीनचे राष्ट्राध्यक्ष ठेवणारा कायदा !
१. आयुष्यभर चीनचे अध्यक्ष रहाण्यासाठी शी जिनपिंग यांनी विधेयक संमत करणे
‘माध्यमांकडून येणार्या वृत्तांप्रमाणे चीनकडून अनेक कायदे संमत केले जात आहेत. यात एका महत्त्वाच्या विधेयकाचा समावेश आहे. त्यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आयुष्यभर अध्यक्ष रहातील आणि दुसरे म्हणजे ‘त्यांच्या विरुद्ध चीनमध्ये कुणीही काहीही बोलले, तर तो गुन्हा ठरील आणि त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल’, अशी तरतूद करण्यात येणार आहे. चिनी कायद्याप्रमाणे चीनच्या अध्यक्षांना केवळ दोनच ‘टर्म’ (मुदत) अध्यक्षपदावर रहाण्याचा अधिकार असतो. त्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागते. शी जिनपिंग यांना तीनदा आणि आयुष्यभरच चीनचे सर्वेसर्वा म्हणून रहाण्याची इच्छा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जे केले, नेमके तेच शी जिनपिंग करू इच्छित आहेत. ते स्वत:ला चीनचे युगपुरुष समजतात आणि त्यांना वाटते की, तेच चीनला महाशक्ती बनवू शकतील. ते हे करू शकतील कि नाही, हे वेगळे सूत्र असले, तरी ‘यापुढे कुणीही शी जिनपिंग यांच्या विरुद्ध बोलू शकणार नाही’, असा कायदा संमत करण्यात आला आहे.
२. चिनी जनतेचा रोष दाबण्यासाठी शी जिनपिंग यांनी देशात नवीन कायदा संमत करणे
२ अ. सामाजिक स्तरावरील विविध गोष्टींमध्ये जिनपिंग सहभागी न होणे आणि चिनी जनतेने जिनपिंग यांच्या विरोधात बोलू नये, यासाठी कायदा संमत करणे : असा कायदा करण्यामागे अनेक कारणे आहेत. आज चीनमध्ये प्रचंड अंतर्गत आव्हाने आहेत. गेल्या २ वर्षांमध्ये शी जिनपिंग कुठल्याही विदेशी दौर्यावर गेलेले नाहीत. एवढेच नव्हे, तर हवामान पालटाविषयी जागतिक स्तरावर नुकत्याच झालेल्या बैठकीलाही ते गेले नाहीत. जागतिक स्तरावर काही महत्त्वाच्या गाठीभेटी झाल्या, त्यातही त्यांनी सहभाग घेतला नाही. चीनमध्ये अंतर्गत आव्हाने वाढत असल्याने ते चीनमध्येच दडून बसले आहेत. चीनमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिएन्ट’ पसरत आहे. त्यामुळे तेथे मृत पावणार्यांची संख्याही वाढली आहे. शी जिनपिंग यांची संपूर्ण दळणवळण बंदी करण्याची पद्धत आहे; पण त्याचा तेथील जनतेला प्रचंड त्रास होतो. आपण जर जनतेला त्रास देणारे काम केले, तर ज्या लोकांना रोजगाराची समस्या उद्भवते, ते याविरोधात बोलू लागतात. त्यांनी तसे करू नये; म्हणून या कायद्याचा वापर केला जाईल.
२ आ. ऑस्ट्रेलियाने घातलेल्या बहिष्कारामुळे चीनमधील उद्योग बंद पडले असून अर्थिक वेगही मंदावणे आणि अन्नधान्याचा तुटवडा भासत असल्याने जिनपिंग यांच्याविषयी जनतेच्या मनात पुष्कळ राग असणे : सध्या चीनमध्ये विजेचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. चीनची वीजनिर्मिती कोळशावर अवलंबून आहे. चीनने ऑस्ट्रेलियाला त्रास दिला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियातून चीनमध्ये कोळसा येणे पूर्णत: थांबले आहे. त्यामुळे विजेवर अवलंबून असलेले अनेक चिनी उद्योग बंद पडले आहेत. त्याचा लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे आणि चीनचा अर्थिक वेग मंदावला आहे. एवढेच नव्हे, तर चीनमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. चीनच्या वर्तमानपत्रांमध्ये शी जिनपिंग यांच्याकडून एक आवाहन करण्यात आले होते की, लोकांनी अन्नधान्य साठवून ठेवावे. यामागील कारण सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले. त्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी पुष्कळ राग आला आहे. ‘चीनच्या उपाध्यक्षांनी आपल्यावर अनेक वर्षे बलात्कार केला’, अशी ‘पोस्ट’ (मजकूर) तेथील एका प्रसिद्ध टेनिसपटूने सामाजिक माध्यमांवर टाकली होती.
२ इ. दिवाळीमध्ये भारताने चिनी साहित्यावर टाकलेल्या बहिष्कारामुळे चीनची ५५ सहस्र कोटी रुपयांची हानी होणे : चीनची लबाडी बहुतांश देशांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे ते चीनपासून त्यांची अर्थव्यवस्था ‘डी कपल’ (वेगळे करणे) करत आहेत. यंदाच्या दिवाळीमध्ये भारताने चिनी साहित्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे चीनची ५५ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली होती. जगभरात चीनच्या विरोधात रोष आहे. त्यामुळे चीनचे उत्पादन, तसेच कारखाने अल्प होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून चीनची अर्थव्यवस्था मंदावत आहे.
२ ई. चिनी जनतेचा शी जिनपिंग यांच्या विरुद्ध असणारा रोष न वाढण्यासाठी कायदा संमत करणे : शी जिनपिंग यांनी रिअल इस्टेट, तंत्रज्ञानातील आस्थापने, अलिबाबा यांसारख्या आस्थापनांना बंद केले आहे. यामागील कारणे वेगळी आहेत; पण त्याचा परिणाम चिनी जनतेवर होत आहे. अनेक पांढरपेशी लोकांच्या नोकर्या गेलेल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे चिनी जनतेचा शी जिनपिंग यांच्या विरुद्ध मोठा रोष आहे. हा रोष सामाजिक माध्यमांमधून अनेक वेळा व्यक्त होत असतो. हा रोष वाढू नये, यासाठी शी जिनपिंगच्या विरुद्ध बोलण्यास प्रतिबंध करणारा कायदा संमत केला जात आहे.
२ उ. अल्पसंख्यांक आणि उघूर मुसलमान यांनीही चीनला विरोध करणे : चीनमधील अल्पसंख्यांकांचाही सरकारच्या विरोधात राग आहे. तिबेटच्या लोकांना चीनमध्ये रहायचे नाही. २ कोटी उघूर मुसलमान चीनच्या विरोधात आहेत. चीनला असे वाटते की, उघूर मुसलमानांची आतंकवादी संस्था ‘आय.आय.टी.एम्.’ यांना तालिबान साहाय्य करत आहे. एका वृत्तवाहिनीवर नुकतेच एक वृत्त पाहिले की, चीनमध्ये विविध ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांत १४-१५ चिनी नागरिक मारले गेले असून अनेक जण गंभीर घायाळ झाले आहेत.
Is Xi Jinping ‘President For Life?’ Why 2022 is Make-or-Break for China’s leader https://t.co/dIyWe5nKzS
— Republic (@republic) November 20, 2021
३. हुकूमशाहीच्या माध्यमातून मनमानी कारभार करता यावा, यासाठी कठीण कायदा संमत करणे; परंतु या माध्यमातून भविष्यात चिनी अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होण्याचीही शक्यता असणे
शी जिनपिंग यांच्या विरोधात आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्याच जनतेचा राग आला आहे. चिनी जनतेचा क्रमांक एकचा शत्रू तो म्हणजे चीनचा कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांचे सर्वेसर्वा शी जिनपिंग आहे. त्यामुळे आपली हुकूमशाही चालू रहावी, लोकांनी आपल्या विरुद्ध बोलू नये अन् आपल्याला हवा तसा मनमानी कारभार करता यावा, यासाठीच हा कठीण कायदा संमत करण्यात आला आहे. या माध्यमातून जनतेचा रोष दाबण्याचा प्रयत्न केला जाईल. एवढे निश्चित की, येणार्या काळात चीनमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि तेथील जनता चिनी कम्युनिस्ट पक्ष अन् शी जिनपिंग यांच्या विरोधात जाऊ शकते. हे थांबवण्यासाठी चीनने सध्याचा कायदा संमत केला आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे