सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवेळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मासेमारी, पर्यटन व्यवसाय आणि शेती-बागायती यांवर परिणाम
मालवण – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अल्प दाबाच्या पट्ट्यामुळे १ डिसेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडत आहे. पावसामुळे भातशेती, आंबा-काजू आणि अन्य बागायती यांवर परिणाम झाला आहे. तसेच समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारी आणि सागरी पर्यटन बंद ठेवावे लागल्याने या व्यवसायांवरही परिणाम झाला आहे.
१ डिसेंबरपासून जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक चालू झालेल्या पावसामुळे नागरिकांचीही असुविधा झाली. सोसाट्याच्या वार्यासह पडणार्या पावसामुळे वीजपुरवठाही सातत्याने खंडित होत होता. २ डिसेंबरला सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता.
समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे येथील बंदरातील छोट्या प्रवासी होड्या (नौका), मासेमारी नौका कोळंब खाडी पात्रात सुरक्षित स्थळी उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. समुद्रात ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वहाण्याची शक्यता आहे. लाटांचा जोरही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रवासी होडी वाहतूक करणार्यांनी, तसेच सागरी आणि खाडी पात्रातील पर्यटन व्यावसायिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी केले आहे.