सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नावरून वाद

सी.बी.एस्.ई.कडून क्षमायाचना

सी.बी.एस्.ई., एन्.सी.ई.आर्.टी. आदी केंद्र सरकारच्या अखत्यारित असणार्‍या शैक्षणिक उपक्रमांमध्ये अद्यापही हिंदूविरोधी लोक बसलेले असल्याने अशा प्रकारचा हिंदुद्वेष ते प्रदर्शित करत असतात. यावर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे ! – संपादक 

सी.बी.एस्.ई.

नवी देहली – सी.बी.एस्.ई. बोर्डा (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)च्या १२ वीच्या परीक्षेच्या वेळी समाजशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘वर्ष २००२ मध्ये कोणत्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये मुसलमानविरोधी हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला ?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या खाली भाजप, काँग्रेस, डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन असे ४ पर्याय देण्यात आले होते. यातला एक पर्याय निवडायचा होता. या प्रश्नामुळे वाद निर्माण झाल्याने सी.बी.एस्.ई.ने ट्वीट करून क्षमा मागितली आहे. तसेच यासाठी उत्तरदायी व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सी.बी.एस्.ई.ने स्पष्ट केले आहे.

१. ‘प्रश्नपत्रिका सिद्ध करणार्‍यांनी केवळ अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची निवड करावी; तसेच लोकांच्या भावना दुखावतील असे सामाजिक, राजकीय प्रश्न टाळावेत, असे सी.बी.एस्.ई.ची मार्गदर्शक तत्त्वे म्हणतात’, असेही सी.बी.एस्.ई.ने दुसर्‍या एका ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.

२. एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रश्न १२ वीच्या एन्.सी.ई.आर्.टी.च्या समाजशास्त्रातील पुस्तकानुसारच आहे. ‘सांस्कृतिक विविधतेसमोरची आव्हाने’ या धड्यामधील एका परिच्छेदामध्ये ‘देशातल्या धार्मिक दंगली आणि त्यातली संबंधित राज्य सरकारांची भूमिका’ याविषयी मत मांडले आहे. ‘धार्मिक हिंसाचार वाढण्यामध्ये सरकारही काही प्रमाणात दोषी असतेच’, अशा आशयाचा हा परिच्छेद आहे. यात उदाहरण म्हणून वर्ष १९८४ मध्ये काँग्रेसच्या काळात देहलीमध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली आणि वर्ष २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेला मुसलमानविरोधी हिंसाचार यांचा उल्लेख करण्यात आला आहे.