अमली पदार्थांच्या व्यसनासाठी बालकाचे अपहरण करणार्यास अटक !
अमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे अत्यावश्यक ! – संपादक
मुंबई – अमली पदार्थाच्या व्यसनासाठी बालकाचे अपहरण करून त्याची विक्री करणार्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवशंकर या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. २५ नोव्हेंबर या दिवशी देहली येथील मानसरोवर पोलीस ठाण्यामध्ये १० वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तो मुलगा रहात असलेल्या इमारतीतील एका व्यक्तीनेच त्याचे अपहरण केल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले. हा आरोपी मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर देहली पोलिसांनी त्वरित मुंबईतील पोलिसांना ही माहिती दिली. मुंबई पोलिसांनी आरोपीला माहीम रेल्वे स्थानकावरून अटक केली. त्यानंतर अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका केली. ‘अमली पदार्थांच्या व्यसनासाठी पैशांची आवश्यकता असल्याने मुलाला विकणार होतो’, असे आरोपीने पोलिसांना सांगितले.