पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा; अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू !
दीपक माने यांचे सांगली महापालिका आयुक्तांना निवेदन
सांगली, २ डिसेंबर – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने राजहंस सोसायटीतील कोट्यवधी रुपये व्यय करून अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारले आहे. यात तैलचित्राच्या माध्यमातून चरित्रपट, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, अहिल्यादेवी यांचा पुतळा, सभामंडप यांचा समावेश आहे. सदर स्मारक पूर्ण होऊन १ वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही हे स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आलेले नाही. तरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू, या मागणीचे निवेदन भाजप संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना १ डिसेंबर या दिवशी दिले. या वेळी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, महेश सागरे, राहुल माने उपस्थित होते.