‘हलाल’ अर्थव्यवस्थेच्या विरोधात जनआंदोलन उभारणे आवश्यक !
वेंगुर्ला येथे पत्रकारांसाठी आयोजित चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांचे आवाहन
वेंगुर्ला – धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) भारत सरकारच्या अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (fssai) कडून प्रमाणपत्र घेतल्यावर खासगी इस्लामी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्याची सक्ती का ? हे प्रमाणपत्र देणार्या संघटनांपैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्मांधांना सोडवण्यासाठी न्यायालयीन साहाय्य करत आहेत. निधर्मी भारतात अशी धर्मावर आधारित समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने ‘हलाल प्रमाणीकरण’ पद्धत तात्काळ बंद करावी, यासाठी प्रत्येक सर्वसामान्य हिंदु नागरिकाने या जनआंदोलनामध्ये सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी पत्रकारांसाठी वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात केले.
या चर्चासत्रात ‘तरुण भारत’चे के.जी. गावडे, प्रदीप सावंत, ‘प्रहार’चे दाजी नाईक, ‘श्रमिक पत्रकार संघा’चे जिल्हाध्यक्ष सुरेश कौलगेकर, ‘पुढारी’चे अजय गडेकर, ‘लोकमत’चे प्रथमेश गुरव, ‘सामना’चे विनायक वारंग हे वृत्तपत्रांचे पत्रकार, तसेच ‘साप्ताहिक किरात’च्या संपादिका सौ. सीमा मराठे, ‘कोकण संवाद’च्या पत्रकार आराधना कोंडूरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे संदेश गावडे अन् गोपाळ जुवलेकर आदी उपस्थित होते. पत्रकारांनी चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या वेळी खाडये सांगितले की,
१. जगातील ५७ इस्लामिक देशांच्या ‘ऑर्गनायझेशन फॉर इस्लामिक को-ऑपरेशन’ या संघटनेने इस्लामिक बँकेला आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी आर्थिक निर्बंधांवर आधारित ही ‘हलाल अर्थव्यवस्था’ ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू केली आहे. हे असेच चालू राहिले, तर ती भारताची इस्लामीकरणाकडे वाटचाल होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
२. ‘हलाल प्रमाणपत्रा’साठी ५० सहस्र रुपये आणि त्यानंतर प्रतिवर्षी नूतनीकरण करण्यासाठी वेगळे शुल्क आकारले जात आहे. यातून निर्माण होत असलेली समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे अत्यावश्यक आहे.
३. त्यामुळे आज आवश्यकता आहे ती, कुठलीही वस्तू खरेदी करतांना ग्राहकाचा हक्क वापरून ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालणे. अशा लहान लहान गोष्टींतून मोठी जनजागृती होऊन ‘हलाल अर्थव्यवस्था’ आपण रोखू शकतो.
पत्रकारांना आवाहन
पत्रकार या नात्याने आणि हिंदु म्हणून आपण हा विषय तळागळापर्यंत पोचवावा, असे आवाहन श्री. खाडये यांनी उपस्थित पत्रकारांना केले. यास सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.