अमली पदार्थांमुळे राष्ट्रच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ! – प्रा. महेंद्र नाटेकर, स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समिती
कणकवली – भारतात लोकसंख्येच्या तुलनेत युवकांची संख्या अधिक आहे. सध्या अनेक तरुण गांजा, अफू, चरस, कोकेन आदी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे अशा युवकांसह कुटुंब, समाज आणि संपूर्ण राष्ट्रच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हे टाळायचे असेल, तर शिक्षक, पालक, समाजसुधारक आणि राज्यकर्ते यांनी अमली पदार्थांपासून तरुण पिढी आणि राष्ट्र वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. (अमली पदार्थांपासून देश वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता एका प्राध्यापकाच्या लक्षात येते; मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्व यंत्रणा हाताशी असलेली आतापर्यंतची सरकारे आणि प्रशासन यांच्याकडून तसे ठोस प्रयत्न होत नसणे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल ! – संपादक) शहरात झालेल्या समितीच्या बैठकीत प्रा. नाटेकर बोलत होते. या वेळी जे.जे. दळवी, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. प्रकाश अधिकारी आदी उपस्थित होते.
या वेळी प्रा. नाटेकर म्हणाले, ‘‘अमली पदार्थ प्रामुख्याने पाकिस्तान, चीन या शत्रूराष्ट्रांच्या सीमेवरून देशात येतात. शाळा, महाविद्यालये यांच्या परिसरात गुप्तरित्या ते उपलब्ध होतात. तालुक्यात काही मोक्याच्या ठिकाणीही ते उपलब्ध होतात. अमली पदार्थांची प्रारंभी अल्प मूल्यात विक्री केली जाते. एकदा त्याची सवय तरुण वर्गाला लागली की, भरमसाठ मूल्य आकारून त्याची विक्री केली जाते अन् विकणारे श्रीमंत होतात. आपल्या देशातही काही जण अफू, गांजा यांचे उत्पादन घेतात. त्याला वेळीच आवर घातला पाहिजे. सत्ता आणि पैसा यांचा ध्यास असलेले तथाकथित लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी विविध प्रकार करतात. त्यामुळे जागरुक नागरिकांनी सावध होऊन त्यांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत.’’