बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती !
१. नवरात्रोत्सव आणि दसरा या कालावधीत धर्मांधांनी हिंदू, मंदिरे, पूजा मंडप यांवर आक्रमण करून हिंदूंच्या हत्या अन् हिंदु महिलांवर बलात्कार करणे
‘१५ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आपण सर्वजण विजयादशमी, म्हणजे दसरा साजरा करत होतो. त्यादिवशी आणि त्याच्या दोन दिवस आधी आपल्या शेजारच्या बांगलादेशामध्ये धर्मांधांनी हिंदु मंदिरे आणि देवी बसवण्यात आलेल्या दुर्गादेवीचा पूजा मंडप यांवर आक्रमण करून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. १३ ऑक्टोबर या दिवशी शुक्रवारच्या नमाजानंतर २०० हून अधिक धर्मांध हिंदू, देवतांच्या मूर्ती, देवळे आणि साधू-संत यांवर आक्रमण करत होते, तसेच आग लावत होते. आक्रमणाच्या पहिल्याच दिवशी इस्कॉनचे २ साधू आणि काही भाविक यांच्या हत्या करण्यात आल्या. धर्मांधांनी दुर्गादेवीचे १६० मंडप आणि मंदिरे यांची मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. १२ हिंदूंची हत्या करण्यात आली, २३ हिंदु माता-भगिनींवर बलात्कार झाले, तर १७ हिंदू बेपत्ता झाले.
आता ज्या बातम्या येतात, त्यात ‘वर्ल्ड हिंदू फेडरेशन बांगलादेश’ शाखेची माहिती अशी आहे की, १३ ते १७ ऑक्टोबर ५ दिवसांमध्ये ३३५ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. हिंदूंची १ सहस्र ८०० घरे जाळण्यात आली. बांगलादेशातील कॉमिला, जानपूर, नौखाली, वडगाव बाजार, नवाबगंज, रंगपूर येथे सर्वाधिक आक्रमणे झाली. १२ हिंदूंच्या हत्या झाल्या, त्यामध्ये ७ पुजारी आहेत. एवढेच नव्हे, तर २३ हिंदु मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार करण्यात आले.
२. फाळणीच्या काळाप्रमाणे धर्मांधांनी नौखाली परिसरात हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणे
वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी धर्मांधांनी नौखाली भागात मोठ्या प्रमाणात हिंदूंची हत्या केली, तसेच माता-भगिनींवर बलात्कार केले. हिंदूंनी प्रतिकार करू नये; म्हणून मोहनदास गांधी त्या वेळी उपोषणाला बसले. तेथून खर्या अर्थाने गांधीगिरी चालू झाली. बांगलादेशामध्ये धर्मांधांनी अनेक ठिकाणी दुर्गा मंडपांवर आक्रमणे केली. त्यातही नौखाली येथील स्थिती गंभीर होती. त्यात ४० हून अधिक लोक घायाळ झाले, अशी माहिती ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांनी दिली. मंदिरांची केवळ तोडफोड करण्यात आली नाही, तर संपत्तीही लुटण्यात आली.
३. इस्कॉन, हिंदु जनजागृती समिती, डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी आणि अन्य संघटना यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा विरोध करणे
बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा राजकीय पक्ष किंवा नेते यांच्यापैकी केवळ डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनीच निषेध केला. ‘बांगलादेशवर थेट आक्रमणच करा’, असा केंद्र सरकारला सल्ला दिला. बांगलादेशमधील लेखिका तस्लिमा नसरीन म्हणाल्या, ‘‘बांगलादेशाचे नाव जिहादी स्थान आहे आणि शेख हसीना त्याची राणी आहे.’’ अशी स्थिती असतांना तेथील प्रसारमाध्यमांनी बांगलादेशात कांगावा करणे चालू केले. ते म्हणाले, ‘‘हिंदूंनी स्वतःच त्यांची घरे आणि मंदिरे यांना आगी लावल्या, तसेच कुराणाचा अवमान केला.’’
खरेतर ३५ वर्षीय इक्बाल हुसैन याने कॉमिला नानुआ दिघी परिसरातील मंदिरामध्ये हनुमानाच्या चरणांजवळ कुराण ठेवल्याचे उघड झाले. दुर्दैव म्हणजे कोणताही राजकीय पक्ष (भाजप सोडून), साम्यवादी, पुरोगामी, प्रसारमाध्यमे यांनी प्रखर विरोध करणे दूरची गोष्ट राहिली, साधा निषेधही केला नाही. एवढेच नाही, तर बंगालमध्ये नेहमी वादग्रस्त विधाने करण्यात प्रसिद्ध असलेला मौलवी पीरजादा अब्बास सिद्दीकी म्हणाला, ‘‘जर कुराणाचा अवमान होत असेल, तर अवमान करणार्यांचा शिरच्छेद व्हायलाच पाहिजे.’’ अशा उद्दाम मौलवीला कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे.
या घटनेला इस्कॉनने थोडीफार प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला; पण ‘इस्कॉन बांगलादेश’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अत्याचाराचा निषेध म्हणून भारतामध्ये हिंदु जनजागृती समिती आणि अन्य प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अनेक ठिकाणी केंद्र सरकार अन् पंतप्रधान यांना निवेदन देऊन निषेध केला. डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी म्हणाले, ‘‘आपण बांगलादेशलापण घाबरतो का ? केंद्रातील भाजप सरकार निषेध का करत नाही ?’’
श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान किंवा अन्य कुठेही जेव्हा हिंदूंवर आक्रमणे होतात, त्यांचा वंशविच्छेद होतो, त्यांच्या महिलांवर बलात्कार होतात, तसेच मंदिरे अन् देवळे यांच्यावर आक्रमणे होतात, साधूसंतांच्या हत्या होतात, अशा वेळी सध्या केंद्रात सत्तास्थानी असलेले हिंदुत्वनिष्ठ सरकार हिंदूंना अपेक्षित कारवाई करत नाही. यामागे ‘या देशांना आपण दुखावले, तर ते चीनला अनुकूल वागतील’, असा दृष्टीकोन असावा. अशा वेळी भविष्यात काय होऊ नये, याची काळजी करण्यापेक्षा आज वर्तमान स्थितीत हिंदूंवर होणारे अत्याचार थोपवण्याचा प्रयत्न करणे, हे भारत सरकारचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे.
अशा स्थितीतही दिलासा देणारी काही वृत्ते आली. या अत्याचारांच्या विरोधात ‘इस्कॉन’चे कार्यकर्ते २३ ऑक्टोबर या दिवशी १५० देशांमध्ये निदर्शने केली. सध्याच्या वृत्तानुसार, या आक्रमणाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १५ राज्यांमध्ये आंदोलन केले आणि ११२ ठिकाणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना निवेदने पाठवली. आफ्रिकेतील हिंदूंनीही बांगलादेशात धर्मांधांनी केलेल्या अत्याचारांच्या विरोधात निषेध नोंदवून कठोर कारवाईची मागणी केली. भारत हा अण्वस्त्रसज्ज देश आहे. पाकिस्तान बांगलादेशवर अत्याचार करत असतांना भारताने त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले खरे; पण धर्मांधांना त्या उपकारांची जाण नाही.
४. भारताने इस्रायलचा आदर्श बाळगावा !
येथे आपण इस्रायलचे उदाहरण समोर ठेवायला हवे. इस्रायल हे इवलेसे राष्ट्र; पण इस्रायली किंवा ज्यू नागरिक यांना जगात कुठेही मारले, तर ते त्या देशात जाऊन मारेकर्यांना कंठस्नान घातल्याविना रहात नाहीत. याचा धसका घेऊन जगातील एकही जिहादी संघटना अथवा आतंकवादी इस्रायली अथवा ज्यू नागरिकांना हात लावायचे धाडस करत नाही. याउलट आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे, अण्वस्रसज्जही आहे, अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आपल्याजवळ आहेत. भारतीय नौदल, वायूदल आणि सैन्यदल हेही अतिशय पराक्रमी आहे; परंतु स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षांमध्ये हिंदूंच्या हत्या अल्प होण्याऐवजी त्यात वाढच होत आहे. ४० वर्षांमध्ये बांगलादेशातील हिंदूंच्या लोकसंख्येत ५ पट घट झाली. तेथे धर्मांध मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या हत्या करतात. या हिंदूंचा दबावगट निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंदूसंघटन होणे आवश्यक आहे. जगभरात कुठेही हिंदूंवर अत्याचार झाले, तर त्यांचा निषेध, विरोध आणि वाच्यता व्हायला पाहिजे. त्याविना त्या गोष्टी न्यून होणार नाहीत.
हिंदूंना इंग्रजांनी शस्त्र बाळगायला बंदी केली, तर मोहनदास गांधी यांच्या अहिंसेने हिंदूंना षंढ करून टाकले. शौर्य जागरण हे तर पुष्कळ आवश्यक आहे. जगात सर्व ठिकाणी त्या त्या देशातील कायदे सांगतात की, आक्रमणे, स्त्रियांवरील अत्याचार आणि घृणास्पद अत्याचार यांचा प्रतिकार करण्याचा आपला अधिकार आहे; मात्र वर्षानुवर्षे हिंदू प्रत्येक ठिकाणी मार खातो. या अत्याचाराचे आपण मूक संमतीदार होऊ नये; कारण त्यातून समष्टीचे पाप लागते. यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या गोष्टीचा विरोध करायला हवा आणि हिंदूसंघटन करायला हवे. आपल्याला अन्य कुणी साहाय्य करत नाही; म्हणून आपण सर्वश्रेष्ठ अशा भगवंताला शरण जायला हवे, तसेच लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (२२.१०.२०२१)
ट्विटरची हिंदूंसमवेत असणारी पक्षपाती वागणूक
इस्कॉन आणि काही हिंदू हे बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांविषयी वाचा फोडण्यासाठी ट्विटरवर माहितीसह आक्रमणाची काही छायाचित्रे ठेवत होते; परंतु ‘हे ‘ट्वीट्स’ पुसून टाकल्याविना त्यांची खाती चालू ठेवणार नाही’, अशी धमकी ट्विटरने दिली. म्हणजे धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी जर हिंदूंनी ‘ट्विटर हँडल’चा उपयोग केला, तर त्याला मात्र ट्विटरने विरोध करायचा. ट्विटरने ‘इस्कॉन बांगलादेश’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांचे ट्विटर खाते बंद केले. ट्विटरप्रमाणे अन्य सर्व बांगलादेशी प्रसारमाध्यमे आणि वृत्तवाहिन्या यांनीही हिंदूंवरील अत्याचाराची वृत्ते जगासमोर येऊ नयेत, यासाठी प्रयत्न केला.
ट्विटरचा हिंदूंना एक न्याय आणि आतंकवाद्यांना दुसरा न्याय आहे. जिहादी आतंकवादी समर्थक डॉ. झाकीर नाईक याचे खाते अजूनही चालूच आहे. आतंकवादी कारवाया केल्याने ज्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालण्याचे काम चालू आहे, तिचे ट्विटर खाते चालू आहे; मात्र धर्मप्रेमी हिंदू आणि हिंदूंना धर्मप्रसार अन् आध्यात्मिक ज्ञान देणार्या संघटना यांची ट्विटर खाती कधीच बंद केलेली आहेत. असे असतांनाही भारतात प्रतिदिन वृत्तपत्रांमधून बांगलादेशची भयावह स्थिती समजत होती.