अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांना बोलावण्याचा निर्णय रहित करावा !
हिंदु जनजागृती समितीची जळगाव आणि नांदेड येथे निवेदनाद्वारे मागणी
उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनाला बोलावणे हा मराठीजनांचा अपमानच ! – संपादक
जळगाव – मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेसाठी कवडीचेही योगदान नसणार्यांची वर्णी लागत आहे. त्यामुळे मराठीजनांचा अपेक्षाभंग होत आहे. मराठीजनांच्या विरोधानंतरही हिंदी आणि उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे म्हणजे मराठीजनांचा अपमानच आहे. जावेद अख्तर हे अर्ध्या शतकाहून अधिक काळ महाराष्ट्रात अर्थात् मराठी भूमीत रहात आहेत; मात्र एवढ्या वर्षांत त्यांनी मराठीच्या हितासाठी कधीही काम केलेले नाही. ते स्वतःही इतक्या वर्षांत मराठी भाषा न शिकता उर्दू-हिंदी भाषेतूनच काम करत आहेत. ज्या व्यक्तीला मराठी भाषेचे कुठल्याही प्रकारचे प्रेम नाही, तिचे मराठी साहित्यात कोणतेही योगदान नाही, त्यांना मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित करणे अयोग्य आहे. एकीकडे मराठी साहित्यात भरीव योगदान देणारे, भाषाशुद्धीची चळवळ राबवून मराठीला समृद्ध करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा करण्यात येते, तर दुसरीकडे हिंदी आणि उर्दू गीतकार असलेले जावेद अख्तर यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. हा एकप्रकारे मराठी भाषेचा अवमानच आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित करावा, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, तसेच आयोजक यांच्या नावे जळगाव जिल्ह्यात चोपडा येथे प्रांताधिकारी आणि यावल येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘काही दिवसांपूर्वीच जावेद अख्तर यांनी हिंदु राष्ट्राचे समर्थन करणार्यांची तुलना क्रूर आणि अत्याचारी तालिबान्यांसह केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेच्या मुखपत्रातून त्वरित निषेधही करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्ष २०१५ च्या दसरा मेळाव्यात जनतेला संबोधित करतांनाच भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १९३८ मध्ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अशा स्थितीत जावेद अख्तर ज्या हिंदु राष्ट्रवाद्यांना ‘तालिबानी’ असे संबोधतात, त्यांनी भूषवलेल्या व्यासपिठावर ते बसणार आहेत का ?’ असा प्रश्नही निवेदनाच्या माध्यमातून आयोजकांना विचारण्यात आला आहे.
नांदेड येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन !
वरील विषयाच्या अनुषंगाने १ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या वतीने नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेश कोंडलवार, धर्मप्रेमी सोपान सोनटक्के, मधुकर भरडे उपस्थित होते.