संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयातील ३ आधुनिक वैद्यांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण !
आधुनिक वैद्यांना मारहाण करून समस्या सुटणार आहे का ? अशा प्रकारच्या वागणुकीचे आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांच्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन समस्या योग्य पद्धतीने सोडवण्यावर भर द्यायला हवा !– संपादक
संभाजीनगर – ‘रुग्णावर योग्य उपचार केले जात नाहीत’, असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी घाटी रुग्णालयातील ३ निवासी आधुनिक वैद्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. या प्रकरणी ३० नोव्हेंबरच्या रात्री गुन्हा नोंद न झाल्याने आधुनिक वैद्यांनी अतीगंभीर वगळता अन्य उपचार सेवा बंद केल्या आहेत.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. काशीनाथ चौधरी यांनी सांगितले की, जुनाबाजार येथे रहाणार्या नासेर महंमद (वय ५० वर्षे) यांच्यावर अस्थिरोग प्रभाग क्रमांक १३ मध्ये उपचार चालू आहेत. ३० नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता त्यांचे ६-७ नातेवाईक आले. ‘नासेर यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत’, असा आरोप करत परिचारिकांशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. ते ऐकताच एका आधुनिक वैद्याने विचारणा केली, तेव्हा त्यांनी आधुनिक वैद्यावर थेट आक्रमण केले. मध्यस्थीसाठी आलेल्या आणखी २ आधुनिक वैद्यांना मारहाण केली. याविषयी मार्डचे अध्यक्ष अक्षय क्षीरसागर यांनी सांगितले की, नासेर यांच्यावर नुकतेच शस्त्रकर्म झाले आहे. मान उंच ठेवण्याची सुविधा असलेला बेड हवा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार तो उपलब्ध करून दिला जात होता; पण संयम न बाळगता नासेर यांच्या नातेवाइकांनी आधुनिक वैद्यांवर आक्रमण करून ते पळून गेले.