डोकलाममध्ये भारताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत धोरण अवलंबले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
चीनविरोधात भारताने पालटलेल्या धोरणाविषयी उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर’ या पुस्तकाचे प्रकाशन !
मुंबई – भारताने जेव्हा जेव्हा बोटचेपी भूमिका ठेवली, तेव्हा तेव्हा आपण आत्मविश्वास आणि भूभाग गमावला. स्वातंत्र्याच्या वेळी आपण पाकिस्तान आणि चीन यांना भूभाग दिला; मात्र डोकलाममध्ये भारताने प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत परराष्ट्र धोरण अवलंबले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हे पहाता आले, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि श्री. चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर दि मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ (VEER SAVARKAR THE MAN WHO COULD HAVE PREVENTED PARTITION) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. २९ नोव्हेंबर या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’मध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.
Released a book ‘Veer Savarkar: The Man Who Could Have Prevented Partition’ authored by @UdayMahurkar ji & Chirayu Pandit @Chirayu1857, in Mumbai.@RanjitSavarkar ji, @udaynirgudkar ji, MLAs @ShelarAshish & @BhatkhalkarA ji too were present. pic.twitter.com/EvFCTmsVbS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2021
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘भारताने ‘हिंदी-चिनी भाई भाई’ हीच नीती ठेवली असती, तर डोकलाम येथील रस्ता चीनने कायम केला असता. त्यानंतर चीनला आपण कधीच थांबवू शकलो नसतो. काँग्रेसचे बोटचेपे धोरण, लांगूलचालन आणि प्रश्नाला कधीही थेट सामोरे न जाण्याची वृत्ती यांमुळे काँग्रेसकडून द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सांगण्यात आला. वर्ष १९४७ मध्ये तो प्रत्यक्ष कृतीत आणण्यात आला. याविषयीचे सत्य लोकांसमोर जाऊ नये, यासाठी काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सतत विविध आरोपांत ठेवायचे धोरण अवलंबले; परंतु सावरकरांचे विचार इतके तेज:पुंज आहेत की, ते झाकता येण्यासारखे नाहीत. त्यामुळे कुणी ना कुणी प्रेरित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार समाजापुढे आणत आहे.’’
या वेळी श्री. चिरायू पंडित म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यानंतर झालेल्या दंगलीच्या वेळी सांगितले होते की, ही लढाई हिंदु-मुसलमान यांमध्ये नाही, तर अखंड भारत आणि अखंड पाकिस्तान यांमधील आहे. याविषयी पूर्ण विचार करावा लागेल. नवीन पिढीपुढे असणारे धोके लक्षात घेऊन हे पुस्तक सिद्ध करण्यात आले आहे.’’
‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय सुरक्षेचे पितामह’ हा पुस्तकाचा महत्त्वाचा भाग ! – उदय माहुरकर, आयुक्त, केंद्रीय माहिती कार्यालय
राष्ट्रीय सुरक्षेविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दृष्टीकोन अधिक महत्त्वाचे होते. ‘ते राष्ट्रीय सुरक्षेचे पितामह आहेत’, हा महत्त्वाचा भाग या पुस्तकातून मांडला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारताची फाळणी रोखण्याचे सर्वतोपरी कार्य केले. याविषयी केलेल्या विविध कार्याची प्रसिद्धी या पुस्तकातून स्पष्ट करण्यात आली आहे.