ओमिक्रॉन व्हायरसविषयी अफवांवर विश्वास ठेवू नका ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
सातारा, १ डिसेंबर (वार्ता.) – देशासह जगभरात सध्या ओमिक्रॉन व्हायरसची चर्चा चालू आहे. समाजमाध्यमांमध्ये याविषयी अफवांचे पेव फुटू लागले आहेत. राज्य याविषयी गंभीर असून परदेशातून येणार्या नागरिकांची विमानतळावरच पडताळणी करून त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी ओमिक्रॉन व्हायरसविषयीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित वृद्धीचा वेग मंदावला आहे; मात्र ओमिक्रॉन व्हायरसविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण आफ्रिकेत या ओमिक्रॉन व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त ऐकायला मिळत आहे. यामुळे राज्यशासनाने तातडीने याविषयी उपाययोजना राबल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांना सतर्क केले असून ‘टास्क फोर्स’ आणि आरोग्य विभाग यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक घेतली आहे. सातारा जिल्ह्यात अद्याप परदेशातून कुणी नागरिक आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हाधिकारी याविषयी नागरिकांशी संवाद साधून वास्तव माहिती देतील.’’