मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

मी वर्ष १९८७ मध्ये अभ्यासवर्ग चालू केल्यावर तेव्हा अभ्यासवर्गाला येणारे श्री. अरविंद परळकर यांनी त्या वेळच्या जुन्या आठवणी आणि इतिहास सांगणारा अप्रतिम लेख लिहिला आहे. त्यांच्या लेखामुळे मी पूर्णपणे विसरून गेलेला सनातनचा इतिहास आणि माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भातील मी विसरलेले अनेक प्रसंग पुन्हा आठवणीत आले. याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच असेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. डॉ. आठवले यांची ‘स्वसंमोहन आणि व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावरील लेखमाला वाचून त्यांच्याविषयी विलक्षण आकर्षण निर्माण होणे

श्री. अरविंद परळकर

‘साधारणपणे वर्ष १९८३ – ८४ मध्ये ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात ‘स्वसंमोहन आणि व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर लेखमाला चालू होती. तिचे लेखक होते, डॉ. जयंत आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले. या लेखमालेतील एक लेख वाचल्यावर माझ्या मनात डॉ. आठवले यांच्याविषयी विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि मी प्रत्येक आठवड्याला ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाचा अंक घेऊन ही लेखमाला वाचायला प्रारंभ केला.

२. ‘आपले व्यक्तीमत्त्व अधिक चांगले करण्यासाठी ‘स्वसंमोहन’ उपयुक्त आहे’, हे लक्षात आल्यावर प.पू. डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटायचे ठरवणे

कोणतीही मानसिक समस्या नसली, तरीदेखील ‘आपले व्यक्तीमत्त्व अधिक चांगले करण्यासाठी ‘स्वसंमोहन’ उपयुक्त आहे’, असे समजल्यावर मी प.पू. डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटायचे ठरवले. त्यांना भेटल्यावर त्यांनी मला ‘स्वसंमोहन कसे करायचे ?’, हे शिकवले आणि ‘‘तुला काही शंका असल्यास मला केव्हाही येऊन भेट’’, असे सांगितले. त्याप्रमाणे काही दिवसांच्या अंतराने मी ३ – ४ वेळा त्यांना भेटलो. तोपर्यंत ‘प.पू. डॉक्टरांचा अध्यात्माशी काही संबंध आहे’, हे मला अजिबात ठाऊक नव्हते. पुढे दोन-अडीच वर्षे चाकरी (नोकरी) निमित्त मला मुंबईबाहेर जावे लागल्यामुळे माझा त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला.

३. श्री मलंग शहा बाबा यांच्या उत्सवाला गेल्यावर तेथे पुन्हा प.पू. डॉक्टरांची भेट होणे, त्यांनी ‘अध्यात्म’ या विषयाचा अभ्यास करत असल्याचे सांगणे आणि साधकाची ते शिकण्याची इच्छा असल्याने त्याला अभ्यासवर्गाला येण्यास सांगणे

वर्ष १९८७ मध्ये मी मुंबईला परतल्यावर माझ्या मेहुण्यांसमवेत सांताक्रूझ येथे श्री मलंग शहा बाबा यांच्या उत्सवाला गेलो होतो. तिथे मी बर्‍याच दिवसांनी प.पू. डॉक्टरांना पुन्हा पाहिले. ते कागद आणि पेन्सिल घेऊन प.पू. मलंग शहा बाबांच्या शेजारी बसले होते आणि सारखे प.पू. मलंग शहा बाबांना काही प्रश्न विचारून ती माहिती लिहून घेत होते. प.पू. डॉक्टरांचे काम आटोपल्यावर मी त्यांना भेटलो. प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘मी आता ‘अध्यात्म’ या विषयाचा अभ्यास अन् त्यावर संशोधन करत आहे. सध्या श्री मलंग शहा बाबा यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा विचार आहे. त्यासाठी माहिती गोळा करत होतो.’’ मी म्हटले, ‘‘मलाही थोडे अध्यात्म शिकवा.’’ प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘मग तू ये ना ! मी आता माझ्या दवाखान्यातच अध्यात्माचे अभ्यासवर्ग घेतो. पुढील अभ्यासवर्ग पुढच्या मासाच्या (महिन्याच्या) दुसर्‍या शनिवारी आणि रविवारी आहे. काही दिवस अगोदर त्याचे वर्तमानपत्रात विज्ञापन (जाहिरात) येते. एकदा येऊन बघ.’’

४. प.पू. डॉक्टरांच्या दवाखान्यात आयोजित केलेल्या अभ्यासवर्गाला गेल्यावर मंत्रमुग्ध होणे आणि ‘हे संमोहन नसून ‘दैवी शक्तीची’ अनुभूती आहे’, हे जाणल्याने अभ्यासवर्ग कधीही न चुकवणे

ठरलेल्या दिवशी मी प.पू. डॉक्टरांच्या दवाखान्यात अभ्यासवर्गाला गेलो आणि मंत्रमुग्धच झालो. मी आधीच संमोहनाचे शिक्षण घेतले असल्याने हे संमोहन नाही, तर ‘दैवी शक्तीची अनुभूती आहे’, हे मला जाणवले. त्यानंतर मी प.पू. डॉक्टरांच्या दवाखान्यात होणारा अभ्यासवर्ग कधीही चुकवला नाही. हा अभ्यासवर्ग वर्षातून ३-४ वेळा व्हायचा. नोकरी करणार्‍या बहुतेकांना शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असल्याने शनिवारी दुपारी २ ते ६ आणि रविवारी दुपारी १२ ते ६ या वेळेत असायचा. मध्ये चहासाठी एक विश्रांती असायची. डॉ. (सौ.) कुंदाताई सर्वांसाठी चहा-कॉफी बनवून आणायच्या.

५. ‘अध्यात्माचा अभ्यासवर्ग पूर्णपणे विनामूल्य असावा’, असे प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून उत्तर आल्यावर त्यांनी फी घेणे बंद करणे

अभ्यासवर्गाच्या वाराच्या ५ – ६ दिवस अगोदर ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांत त्याचे विज्ञापन (जाहिरात) यायचे. विज्ञापन आणि इतर व्यय (खर्च) यांसाठी प्रारंभी अभ्यासवर्गाला ५० रुपये शुल्क (फी) आकारले जायचे; पण पुढे प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून असे उत्तर आले की, ‘‘हे शुल्कसुद्धा आकारायचे नाही. अध्यात्माचा अभ्यासवर्ग पूर्णपणे विनामूल्य असावा.’’ त्यामुळे त्यांनी ही शुल्क घेणे बंद केले. (श्री. राजन जावळे, श्री. नितीन चुरी, सौ. साधनाताई पै, श्री. विवेक वारंग हे अभ्यासवर्गाला नियमित येणार्‍यांपैकी असून बाकी काही नवीन तोंडवळे (चेहरे) असायचे.)

६. दवाखान्यातील एका खोलीत प.पू. डॉक्टरांनी भिंतीला फळा लावून तेवढ्याच जागेत शिकवण्यास प्रारंभ करणे

प.पू. डॉक्टर त्यांच्या दवाखान्यातील एका खोलीत भिंतीला फळा लावून शिकवायचे आणि समोर १६ ते १७ जण बसू शकतील, एवढीच जागा होती. नियमित येणारे अन् नवीन असे मिळून नेहमी नेमके तेवढेच साधक अभ्यासवर्गाला यायचे. ‘कधी काही जागा रिकाम्या राहिल्या किंवा उपस्थिती अधिक असल्याने बसायला जागा नाही’, असे कधीही झाले नाही.

७. प.पू. डॉक्टरांनी साधकांच्या संदर्भासाठी ‘अध्यात्मशास्त्र’ या नावाचे एक पुस्तक तयार करून अनेक साधकांना त्या संदर्भातील टंकलेखन आणि आकृती काढण्याची सेवा करण्यास शिकवणे

प.पू. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या ‘भारतीय संमोहन उपचार आणि संशोधन संस्थे’च्या वतीने अभ्यासवर्ग आयोजित केले जात असत. प.पू. डॉक्टरांनी साधकांच्या संदर्भासाठी ‘अध्यात्मशास्त्र’ या नावाचे एक पुस्तक सिद्ध केले होते. पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने पुस्तक छपाईचा व्यय (खर्च) संस्थेला झेपणार नव्हता; म्हणून मर्यादित अशा केवळ १०० प्रती चक्रमुद्रांकित (सायक्लोस्टाईल) करून घेतल्या होत्या. यातील टंकलेखन अन् ठराविक जागी असलेल्या आकृत्या नियमित येणार्‍या साधकांनी स्वतः मेहनतीने केल्या होत्या. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या अनेक साधकांना सेवा करण्यास शिकवले. त्याचा प्रारंभ इथून झाला, तरीदेखील पुस्तक बनवण्यास जो व्यय (खर्च) आला, त्यासाठी पुस्तकाचे मूल्य रु. ८५ इतके ठेवण्यात आले होते.

८. अभ्यासवर्गातील अनुभूती

८ अ. अभ्यासवर्गात शिकवतांना प.पू. डॉक्टरांच्या हातातील मनगटी घड्याळाच्या स्पंदनांचा आवाज ऐकू येणे : अभ्यासवर्गात शिकवतांना प.पू. डॉक्टरांच्या हातातील मनगटी घड्याळ काही वेळा थरथरायचे. उपस्थितांपैकी बर्‍याच जणांना ते थरथरतांना दिसायचे, तर कधी त्याच्या स्पंदनांचा आवाजही ऐकू यायचा. मग प.पू. डॉक्टर याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करायचे. ‘अभ्यासवर्ग योग्य प्रकारे चालला आहे किंवा काही पवित्र शक्ती वा संत सूक्ष्म रूपाने अभ्यासवर्गाला येऊन बसले आहेत’, असे याचे उत्तर मिळायचे.

८ आ. मुंबईचे संत ‘श्री मलंग शहा बाबा’ अचानकपणे अभ्यासवर्गात येणे आणि त्यांनी वर्गात बसून संपूर्ण सिगारेट ओढली, तरी कुणालाही त्या बंद खोलीत सिगारेटचा त्रासदायक वास न जाणवणे : एकदा मुंबईचे संत ‘श्री मलंग शहा बाबा’ अचानकपणे अभ्यासवर्गात आले. डॉक्टर म्हणाले, ‘‘आता वेगळा अभ्यासवर्ग घेण्याची आवश्यकता नाही. ‘संतांचे दर्शन’ हाच आजचा अभ्यासवर्ग. नेहमीपेक्षा आज तुम्हाला अधिक शिकायला मिळेल. श्री मलंग शहा बाबांना सिगारेट ओढायची सवय होती. त्यांनी एक सिगारेट काढून ती ओढली. त्यांची सिगारेट संपूर्ण ओढून झाली, तरी कुणालाही त्या बंद खोलीत सिगारेटचा त्रासदायक वास जाणवला नाही.

८ इ. दादर येथील ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त आणि वैद्य श्री. अन् सौ. पुरंदरे यांनी अभ्यासवर्गासाठी ज्ञानेश्वर मंदिरात मोठी जागा उपलब्ध करून देणे : दादर (प.) येथील ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त आणि वैद्य श्री. आणि सौ. पुरंदरे यांना या अभ्यासवर्गांविषयी समजले. एकदा थोडा वेळ येऊन त्यांनी अभ्यासवर्ग कसा चालतो, तेही पाहिले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही या एवढ्या लहान जागेत हे अभ्यासवर्ग का घेता ? आमच्या ज्ञानेश्वर मंदिरात या. मी तुम्हाला मोठी जागा उपलब्ध करून देतो. मंदिराच्या फलकावर आपण याविषयी माहिती लिहून ठेवू. पुष्कळ जिज्ञासू लोकांना याचा लाभ मिळेल. तुम्हालाही अधिक लोकांपर्यंत पोचता येईल.’’ प.पू. डॉक्टरांनी ते मान्य केले आणि आम्ही प्रथमच अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी प.पू. डॉक्टरांच्या दवाखान्यातून बाहेर पडलो. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी अभ्यासवर्ग घ्यायचे ठरले.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– श्री. अरविंद परळकर, मुंबई (२१.४.२०२०)