कोकणातील नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर महाड येथे स्थापन होणार ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे कायमस्वरूपी पथक !
मुंबई, १ डिसेंबर (वार्ता.) – चक्रीवादळ, पूर, भूकंप आदी नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये तातडीने साहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन्.डी.आर्.एफ्.) कायमस्वरूपी पथक स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. हे पथक ४ बटालियनचे असणार आहे, अशी माहिती आपत्ती नियंत्रण कक्षातील अधिकार्यांकडून देण्यात आली आहे. केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियंत्रणासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडे याचे दायित्व असेल.
या पथकामध्ये २१५ जणांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये ३ कमांडर आणि ४६ सैनिक यांचा समावेश असणार आहे. या पथकाच्या कार्यालयाचा आराखडा सिद्ध करण्याचे काम राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून करण्यात येत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष इमारतीच्या कामाला प्रारंभ होईल.
नुकत्याच होऊन गेलेल्या पावसाळ्याच्या कालावधीत कोकणामध्ये आलेले चक्रीवादळ आणि पूर यांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच रायगड जिल्ह्यांत मोठी हानी झाली होती. महाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या वेळी साहाय्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सैनिकांना पाचारण करण्यात आले होते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्यास अशा संकटात सापडलेल्या नागरिकांना जलद गतीने साहाय्य उपलब्ध होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोकणात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कायमस्वरूपी पथक स्थापन करण्याची मागणी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी महाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. याविषयी खासदार सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही लिहिले होते. त्यानंतर केंद्रशासनाच्या अनुमतीनंतर महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक स्थापन करण्याची कार्यवाही राज्यशासनाकडून चालू करण्यात आली आहे.
या पथकाची उभारणी करण्यासाठी महाड येथील दूध योजनेची २.५७ हेक्टर जागा रायगड जिल्हाधिकार्यांनी महसूल विभागाकडे हस्तांतरित केली आहे. दूध योजनेसाठी रामबाग (अलिबाग) येथे पर्यायी जागा देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात नागपूर येथे अशा प्रकारे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियंत्रणाखाली राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाचे सैनिक कोल्हापूर, सोलापूर, धुळे आणि नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. महाड येथे या पथकाची कायमस्वरूपी स्थापना झाल्यास तेथील संकटकाळात या सैनिकांचे तातडीने साहाय्य होऊन जीवित आणि वित्त हानी टाळता येणार आहे.