कोरोना लसीकरण प्रमाणपत्राविना प्रवासी वाहतूक करू नये ! – विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
सातारा, १ डिसेंबर (वार्ता.) – सार्वजनिक आणि खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी सर्व वाहन चालक-मालक आणि प्रवासी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व खासगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा पुरवणारे सर्व वाहन चालक-मालक यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राविना प्रवाशांची वाहतूक करू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सार्वजनिक वाहनातून सेवा पुरवणार्या वाहनमालकांनी कोरोना अनुरूप वर्तनाचे पालन न केल्यास मालक आणि चालक यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, तसेच खासगी बसगाड्यांच्या माध्यमातून सेवा देतांना नियम मोडल्यास प्रत्येक वेळी १० सहस्र रुपये दंड आकारण्यात येईल. वारंवार कर्तव्यात चूक घडत असेल, तर कोरोनाविषयक अधिसूचना कार्यान्वित असेपर्यंत वाहनमालकांचे अनुज्ञप्तीपत्र काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन २ दिवस बंद करण्यात येईल.