‘हिंदु राष्ट्रा’साठी दिला भगवंताने कैलासाचा मुकुट भारी ।
‘सकाळी मी कृष्णाची पूजा करत होते. कृष्ण झोपाळ्यावर बसला होता. मी कृष्णचरणांना गंध लावत होते. त्या क्षणी मी भावावस्थेत गेले. कृष्णाचे मऊ चरण माझ्या हाताला लागले. गंधाचे शीतल बोट लागले; म्हणून कृष्ण खाली पाहून हसला. दुपारी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त ध्वनीचित्र चकती दाखवण्याचा कार्यक्रम होता. तो पहाण्यासाठी मी एका साधकाच्या घरी गेले होते. ‘देवा, मी तुझा डोलोत्सवाचा (तू झोपाळ्यावर बसलेल्याचा) कार्यक्रम पहात असतांना माझ्या ओठी शब्द उमटत होते आणि मी ते मनाच्या पाटीवर लिहीत होते.
कशास हवा देवा, तुला दोन फुटांचा झोपाळा ।
कशास हव्यात देवा, तुला चार फुलांच्या माळा ।। १ ।।
पृथ्वीच्या या झुल्यावर नित्य बसून झुलावे ।
तरुवरची ही अगणित फुले पाहून अंतरी खुलावे ।। २ ।।
कशास हवे देवा, तुला हे तीन फुटांचे सिंहासन ।
देवा, तुझेच आहे ना पृथ्वीचे हे महान आसन ।। ३ ।।
सांग ना देवा, कशास हवीत ही चार पुष्पे चरणी ।
प्रतिदिन तरुवरून रिती होती असंख्य फुले अंगणी ।। ४ ।।
कशास हवे देवा, हे लहान नृत्य-गायन ।
प्रतिदिन पहाटे चाले असंख्य मोर-कोकिळेचे नृत्य-गायन ।। ५ ।।
सांग ना देवा, ओझ्याचा का हवा मुकुट शिरी ।
‘हिंदु राष्ट्रा’साठी दिला भगवंताने कैलासाचा मुकुट भारी ।। ६ ।।
भारतमातेचे चरण प्रक्षाळतो (टीप १) हा हिंदी महासागर ।
विवेकानंदाचा ‘कौशिकमुनी’ प्रतिदिन रामरक्षा म्हणतो पाषाणावर (टीप २) ।। ७ ।।
भारताच्या शिरी न्हाऊ घालते वरुण मेघांची स्वारी ।
सूर्यदेव उभे प्रभाती दीप लावून जगन्नाथाच्या द्वारी ।। ८ ।।
आरती घेऊनी उभी कृष्णसखी गुरुद्वाराच्या स्थळी ।
प्रसन्न पारिजात वाहतो भूमीवर सुगंधाची पुष्पांजली ।। ९ ।।
असे हे आमचे स्वप्न महान ।
कशास हव्यात गोष्टी सान-सान ।। १० ।।
टीप १ – प्रक्षाळतो – धुतो
टीप २ – विवेकानंद हे कौशिकमुनींचे अवतार आहेत. कन्याकुमारीला जे विवेकानंदाचे स्मारक आहे, तेथे बसून ते भारताच्या रक्षणार्थ रामरक्षा म्हणत आहेत.
– कृष्णपुष्प (पूर्वाश्रमीच्या पुष्पांजली)(आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), बेळगाव (२.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |