सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात नामजप करतांना साधिकेने केलेले विविध भावप्रयोग आणि आलेल्या अनुभूती
१. ‘सहसाधिकेच्या रूपात श्रीकृष्ण सेवारूपी प्रसाद देत आहे’, असे वाटणे
‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने स्वयंपाक विभागात सेवा करतांना सर्व संतांच्या चैतन्याने सेवा पुष्कळ चांगली झाली आणि मला सेवेतून आनंद मिळाला. सेवा करतांना ‘कु. वेदिका खातू यांच्या मुखातून श्रीकृष्णच बोलत आहे’, असे मला वाटले. ताई प्रत्येक सेवा वेळेत, गांभीर्याने आणि नीटनेटकी करवून घेत असे. तिचे सगळीकडे बारकाईने लक्ष असायचे. तिच्यामध्ये नियोजनकौशल्य आहे. ‘प्रत्येक साधकाचा वेळ सेवेसाठी वापरला जावा’, अशी तिची पुष्कळ तळमळ असते. ‘ताई म्हणजे गुणांची खाण आहे’, असे वाटते. तिच्याकडे बघून ‘श्रीकृष्ण सेवारूपी प्रसाद द्यायला आला आहे’, असे वाटते.
२. परात्पर गुरुदेव पूर्वी निवासाला असलेल्या खोलीमध्ये उपाय करतांना आलेल्या अनुभूती
अ. रामनाथी आश्रमात गेल्यापासून परात्पर गुरुदेव पूर्वी रहात खोलीमध्ये नामजपादी उपायांना गेल्यावर ‘मी पाण्यावर तरंगत आहे’, असे जाणवायचे.
आ. प्रतिदिन ‘परात्पर गुरुदेव सगुण रूपात तिथेच आहेत’, असे मला जाणवायचे आणि पुष्कळ उपाय व्हायचे.
इ. परात्पर गुरुदेव श्रीकृष्णाच्या रूपात दिसणे आणि ‘त्यांच्याकडून सुदर्शनचक्र सुटून षट् चक्रांवरील काळे आवरण नष्ट होत आहे’, असे जाणवणे : १४.६.२०१८ या दिवशी नामजपादी उपायांना बसल्यावर ‘परात्पर गुरुदेवांच्या पायांना मर्दन (मालीश) करत आहे’, असा भाव ठेवून मी नामजप करत होते. तसा नामजप मी प्रतिदिन करत होते; पण या दिवशी वेगळेच अनुभवायला मिळाले. परात्पर गुरुदेव प्रथम श्रीकृष्णाच्या रूपात दिसले. नंतर ‘त्यांच्याकडून सुदर्शनचक्र सुटून माझ्या षट्चक्रांवरील काळ्या शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले. परात्पर गुरुदेव श्रीकृष्णाच्या विराट रूपात दिसू लागले. त्या वेळी ‘मी कुठे आहे ?’, हे मी शोधायला लागले. तेव्हा मी ‘परात्पर गुरुदेवांच्या विराट रूपाच्या चरणी अर्जुनाप्रमाणे बसले आहे’, असे मला दिसले. त्या वेळी मला पुष्कळ हलके वाटत होते. आज्ञाचक्रावर पुष्कळ संवेदना जाणवत होत्या. मन एकाग्र होऊन निर्विचार झाले होते. ‘केवळ देव आणि मी आहे’, असे वाटून मला शांत वाटत होते.
३. ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती
३ अ. वायुदेवाचा स्पर्श झाल्यावर ‘वायुतत्त्व वार्याप्रमाणे शरिरात जात आहे’, असे जाणवणे : सकाळी ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर ‘परात्पर गुरुदेवांना अभ्यंगस्नान घालत आहे’, असा भाव ठेवून मी नामजप करायला आरंभ केला. तेव्हा ‘ॐ ॐ श्री वायुदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा नामजप उपायांसाठी आला होता. त्याप्रमाणे भाव ठेवून नामजप केल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरच वायुदेव आहेत’, असे मला वाटले. त्यांचा स्पर्श झाल्यावर ‘वायुतत्त्व झपाट्याने माझ्या शरिरात वार्याप्रमाणे जात आहे’, असे मला १५ मिनिटे जाणवत होते.
३ आ. ‘ॐ’ने शरीर पूर्ण भरून जाणे आणि दिवसभर भावपूर्ण नामजप होणे : ‘शिवाच्या मस्तकावरील गंगाजलाने परात्पर गुरुदेवांना मी स्नान घालत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या. पुढील ५ मिनिटे परात्पर गुरुदेवांच्या सहस्रारचक्रातून माझ्या पूर्ण शरिरात ‘ॐ’ प्रवेश करत होता. त्यानंतर माझ्या शरिरातून ‘ॐ ॐ’ असा ध्वनी दुपारपर्यंत बराच वेळ ऐकू येत होता. ‘ॐ’ ने माझे शरीर पूर्ण भरून गेले होते. दिवसभर पुष्कळ भावपूर्ण नामजप होत होता.
३ इ. नामजप करतांना काही वेळ केवळ सूक्ष्मातून हात दिसून ‘ते स्वतःवरील आवरण काढत आहेत’, असे जाणवणे आणि समोर साधकांच्या रक्षणासाठी यज्ञ करणारे एक गौरवर्णी ऋषि परात्पर गुरुदेवांसारखे दिसणे : २०.६.२०१८ ला रात्री नामजप करण्याच्या खोलीमध्ये बसून नामजप करतांना मला सतत अर्धा घंटा पुष्कळ जांभया आणि ढेकरा येत होत्या. त्यानंतर १५ मिनिटे सूक्ष्मातून केवळ हात दिसले अन् ‘ते हात माझ्यावरील काळ्या शक्तीचे आवरण काढत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी एक गौरवर्णी ऋषि समोर बसलेले दिसू लागले. ‘ते ऋषि तिथेच साधकांच्या रक्षणासाठी यज्ञ करत आहेत’, असे मला जाणवले. नंतर ते ऋषि परात्पर गुरुदेवांसारखेच दिसत होते.
४. स्वयंसूचना सत्रे करतांना आलेल्या अनुभूती
अ. स्वयंसूचनाचे सत्र करतांना ‘देवा, पेशीपेशींमध्ये तुझे चैतन्य जाऊ दे’, अशी प्रार्थना होत होती. त्यामुळे माझ्यावरील आवरण न्यून झाले.
आ. ‘व्यष्टी साधनेचे गांभीर्य अल्प आहे’, याविषयी स्वयंसूचना देतांना अंतर्मनातून आवाज आला, ‘मी देवाच्या प्राप्तीसाठी आलो आहे. मी हिला सतत नामजपाची आठवण करून देईन.’
इ. ‘अव्यवस्थितपणा’ या स्वभावदोषावर स्वयंसूचना देतांना माझे हात देवाशी बोलायला लागले, ‘सर्व व्यवस्थित करणे, हे माझेही दायित्व आहे. मी व्यवस्थितपणा आणण्यासाठी प्रयत्न करीन.’
‘हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती अनिता भोसले, कराड, सातारा. (२७.६.२०१८)
|