सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ऑनलाईन’ जुगारावर आळा घालून भावी पिढी उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा ! – मनसेची सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांकडे मागणी
जत्रोत्सव, तसेच अन्य वेळी चालणार्या जुगारावरही कारवाईची मागणी
जुगाराचे दुष्परिणाम लक्षात आणून देऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी पोलिसांकडे का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना जिल्ह्यात चालू असलेला जुगार लक्षात येत नाही कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ? – संपादक
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अनेक ठिकाणी जुगार मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यात ‘ऑनलाईन’ जुगार खेळण्याची माध्यमेदेखील सक्रिय झाली आहेत. ती वेळीच बंद झाली नाहीत, तर त्याचा भावी पिढीवर मोठा दुष्परिणाम दिसून येणार आहे. जिल्ह्यात कर्जबाजारीपणा आणि नैराश्य यांमुळे तरुणांच्या आत्महत्यांमध्ये अधिक वाढ झालेली दिसेल. यासाठी जुगाराच्या विविध प्रकारांवर वेळीच कारवाई करा, अशी मागणी मनसेचे नेते माजी आमदार परशुराम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे. या वेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, कणकवली येथील दत्ता बिडवाडकर, राजेश टंगसाळी, वैभव धुरी, संतोष कुडाळकर, चंदू चाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी नाशिक जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकार्यांनी ‘ऑनलाईन’ जुगार आणि तत्सम् पैशांचे आमिष दाखवणारे खेळ यांवर बंदी आणल्याचे उपरकर यांनी पोलीस उपअधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. ‘ऑनलाईन’ जुगाराचे पेव सिंधुदुर्गातदेखील आले असून काही मंडळी ‘ऑनलाईन’ जुगाराचे स्वतःचे ‘अॅप’ सिद्ध करून अल्पवयीन मुले, वृद्ध, महिला, पुरुष यांना जुगारासाठी उद्युक्त करून त्यांची आर्थिक लूट करत आहेत. (एक राजकीय पक्ष जिल्ह्यात कशा प्रकारे समाजविघातक काम चालू आहे, याची माहिती काढू शकतो, तर पोलिसांना ही माहिती का मिळत नाही ? हा प्रश्न आहे ! – संपादक)
२. काही मुलांनी इतरांकडून कर्जाऊ पैसे घेऊन जुगारात लावले आणि ते जुगार हरल्यामुळे कर्जबाजारी झाले आहेत, अशा तक्रारी पालकांकडून मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात या ‘ऑनलाईन’ जुगारात प्रतिदिन अनुमाने ३५ ते ४० लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती मिळाली आहे. (जनता त्यांच्या तक्रारी घेऊन राजकीय पक्षांकडे जाते; मात्र पोलिसांकडे का जात नाही ? कारण जनतेला ठाऊक आहे की, एखादी माहिती दिली, तर मुख्य विषय सोडून माहिती देणार्याच्या मागेच पोलिसांचा ससेमिरा लागतो. त्यामुळे बर्याच प्रकरणात पोलिसांना माहिती देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही, ही वस्तूस्थिती नाकारात येत नाही ! – संपादक)
३. ‘ऑनलाईन’ पद्धतीने मिनिटामिनिटाला चालणारे २५ ते ३० पद्धतीचे जुगाराचे खेळ बंद करण्यासाठी याचे प्रमुख ‘डीलर’ किंवा वितरक कोण आहेत ? याची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
४. जत्रोत्सव आणि अन्य वेळी ग्रामीण भागात चालणार्या जुगाराच्या विरोधातही पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन ते बंद करावेत.
५. गोवा बनावटीच्या मद्याची जिल्ह्यात होणारी अवैध वाहतूक काही पोलीस कर्मचार्यांच्या सहकार्यामुळेच होत असून पुढे ते मद्य महाराष्ट्रात पोचवले जाते. यामुळे राज्याचा महसूल बुडाल्याने आर्थिक हानीही होत आहे. (सातत्याने कारवाई केली जात असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक होतच आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील काही कर्मचार्यांच्या सहकार्यामुळेच मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचा मनसेचा आरोप चुकीचा म्हणता येईल का ? – संपादक)
६. दोडामार्ग, सावंतवाडी आणि माणगाव खोर्यात केरळमधील लोक केळी आणि अननस यांच्या बागेतून गांजाची लागवड करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आळा घालून अल्पवयीन मुले आणि तरुण पिढी यांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे.
आंबोली-चौकुळ येथे झालेल्या मेजवानीची चौकशी करण्यासाठी मनसेचे निवेदन
आंबोली-चौकुळ येथील एका हॉटेलवर नुकतीच पोलिसांनी धाड टाकून १० युवतींसह ३४ जणांना कह्यात घेतले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी मनसेच्या वतीने एका निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग पोलिसांकडे करण्यात आली आहे.