गोव्यातील एक मंत्र्याचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग !
१५ दिवसांत संबंधित मंत्र्याला मंत्रीमंडळातून काढा अन्यथा आंदोलन छेडू ! – गिरीश चोडणकर, काँग्रेस
हे खरे असल्यास केवळ मंत्रीमंडळातून काढण्याची मागणी का ? संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस का करत नाही ? तसेच पोलिसांत पुराव्यांनिशी तक्रार का केली जात नाही ? या गोष्टी न केल्यामुळे ‘केवळ राजकीय स्वार्थासाठी असे आरोप केले जातात’, असे जनतेला वाटणे साहजिक आहे. – संपादक
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील भाजप सरकारमधील एका मंत्र्याचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग आहे. सरकारमध्ये असलेल्या पदाचा गैरवापर करून संबंधित मंत्री एका महिलेचे लैंगिक शोषण करत आहे. सरकारने पुढील १५ दिवसांत संबंधित मंत्र्याला मंत्रीमंडळातून काढून टाकून त्याच्यावर कारवाई करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबर या दिवशी गोवा भेटीवर येत आहेत. तत्पूर्वी संबंधित मंत्र्यावर कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्ष महिलेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार, अशी चेतावणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘दोन व्यक्तींनी संबंधित मंत्र्याची आक्षेपार्ह छायाचित्रे आणि चलचित्रे (व्हिडिओ) मला दाखवली आहेत, तसेच संबंधित मंत्र्याने महिलेला गर्भपात करण्यास सांगितल्याची ‘ऑडिओ क्लिप’ मी ऐकली आहे. महिलेचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ठाऊक आहे; मात्र ते स्वत:च्या लाभासाठी संबंधित मंत्र्याला पाठीशी घालत आहेत.’’
मंत्र्याचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग असल्याच्या आरोपात तथ्य ! कार्लुस आल्मेदा, आमदार, भाजप
एका मंत्र्याचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग असल्याच्या आरोपात तथ्य आहे आणि या प्रकरणाचा ५ राज्यांत होणार्या निवडणुकीमध्ये भाजपवर परिणाम होणार आहे, असा दावा भाजपचे वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला आहे.
मंत्र्यांवरील आरोप हा हवेतील गोळीबार ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी मंत्र्यांवर ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग असल्याचा केलेला आरोप म्हणजे हवेत गोळीबार आहे. कुणाचेही नाव न घेता आरोप करणे, हे एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला शोभत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.