(म्हणे) ‘महिलांच्या सुरक्षेसाठी ‘डॉन्स बार’ला अधिकृत मान्यता देण्यासाठी कायदा करा !’ कळंगुट येथील पोलीस निरीक्षकाची मागणी
महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली महिलांचा सहभाग असलेले ‘अनधिकृत डान्स बार’ अधिकृत करण्याची शिफारस, ही ‘रोगाहून इलाज भयंकर’ अशी नाही का ? – संपादक
कळंगुट, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – बार, रेस्टॉरंट, क्लब आणि पब यांच्यामध्ये काम करणार्या महिलांना सन्मानाचे जगता यावे, यासाठी डॉन्स बार, पब, रेस्टॉरंट आदींमध्ये महिलांना रोजगार देण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी करणारे शिफारस पत्र कळंगुटचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोज यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना दिले आहे. कळंगुट परिसरात अनेक ‘डान्स बार’ आहेत आणि त्यामध्ये महिला काम करत असल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे.
या शिफारस पत्रात पोलीस अधिकारी रापोज म्हणतात, ‘‘कांदोळी, कळंगुट, बागा आणि हडफडे या भागांत एक डझनांहून अधिक ‘बार अँड रेस्टॉरंट’ यांच्या नावाने क्लब चालू आहेत. हे क्लब रात्री उशिरापर्यंत चालू असतात. यामध्ये ‘वेटर’ किंवा ‘डान्सर’ म्हणून महिला कर्मचारी आहेत. यामुळे पोलिसांना रात्री उशिरा अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. ‘डान्स बार’ कायदेशीर केल्यास त्यावर पोलिसांना नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी यापूर्वी ‘डान्स बार’ना अधिकृत मान्यता देणारा कायदा केला आहे. यामुळे हे ‘डान्स बार’ सायंकाळी ६ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत कार्यरत असतात. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी ही शिफारस मान्य करून ती शासनाकडे मांडावी.’’