जुने गोवे येथील वादग्रस्त बांधकाम बंद करण्याचा जुने गोवे पंचायतीचा आदेश
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – जुने गोवे येथील वारसा स्थळाजवळील वादग्रस्त बांधकाम त्वरित थांबवण्याचा आदेश जुने गोवे पंचायतीने दिला आहे. जुने गोवे पंचायत मंडळाच्या ३० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या बैठकीनंतर हा आदेश देण्यात आला.
पंचायत मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना पंचायतीच्या सरपंच जोनिता मडकईकर म्हणाल्या, ‘‘पंचायतीने संबंधित बांधकामाला पुनर्बांधकाम करण्यासाठी दिलेली अनुमती आणि बांधकामाला दिलेला घर क्रमांक पंचायतीने रहित का करू नये ? या आशयाची ‘कारणा दाखवा नोटीस’ पाठवली आहे. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी संबंधितांना ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संबंधित बांधकाम ‘कोर्नस इन्फ्रास्ट्रक्चर लि.’ यांच्या नावावर स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेवर स्थगिती आणण्याचा निर्णयही पंचायत मंडळाने घेतला आहे.’’
जुने गोेवे येथील वादग्रस्त बांधकामाला दिलेली मान्यता शहर आणि नगरनियोजन खात्याने मागे घेतली
पणजी – जुने गोेवे येथील वादग्रस्त बांधकामाला दिलेली मान्यता शहर आणि नगरनियोजन खात्याने मागे घेतली आहे. संबंधित बांधकाम त्वरित थांबवावे, असे शहर आणि नगरनियोजन खात्याने ३० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी उशिरा काढलेल्या एका आदेशात म्हटले आहे. ही माहिती शहर आणि नगरनियोजन मंत्रीपद सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली.