साहित्य संमेलन कि धर्मद्रोह्यांचा अड्डा ?
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी न झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा होणार; म्हणून आनंदात असणारे मराठी भाषिक आणि साहित्यिक यांच्या आशा-आकांक्षा यावर संमेलन होण्याच्या अगोदरपासूनच पाणी फिरवण्याचे काम आयोजक करत आहेत. अर्थात् ज्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप असून जे १ वर्षाहून अधिक काळ कारागृहात होते आणि ज्या पक्षाचा इतिहासच हिंदुविरोधी अन् अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणारा असा आहे, अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री असलेले छगन भुजबळ यांच्याकडे मुख्य संयोजकपद आहे. त्यामुळे ‘या संमेलनातून काय साध्य होणार ?’ हाच प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या आयोजनात साहित्यिकांपेक्षा शासनकर्त्यांचेच वर्चस्व अधिक दिसून येते. त्यामुळे ‘ही साहित्य संमेलने आता धर्मद्रोह्यांचे अड्डे होत चालली आहेत’, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत असून नाशिकचे सुपुत्र असलेले आणि मराठी साहित्यातही तितकेच योगदान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून पुष्कळ काही करण्याची संधी संमेलनास होती. या निमित्ताने स्वातंत्र्यविरांचा साहित्यरूपी ठसा व्यापक स्तरावर नेण्याची संधी आयोजकांकडे होती; मात्र घडले वेगळेच ! संमेलनाच्या गीतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामोल्लेख टाळण्यात आला; पण विरोधानंतर ते समाविष्ट करण्यात आले. हे संमेलन कुणाच्या तालावर चालू आहे आणि पुढे अजून काय काय पहावे लागणार आहे ? हे यावरून लक्षात येते.
जे नेहमीच हिंदु धर्माच्या विरोधात बोलतात, लिहितात, अशा जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ज्यांचे मराठी भाषा, साहित्य यांसाठी काही योगदानच नाही, तसेच जे उर्दू-हिंदीमधून संवाद साधतात, अशांना बोलावून आयोजकांना नेमके काय साध्य करायचे आहे ? संयोजकांनी यापूर्वीही ख्रिस्ती धर्मप्रचारक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना थेट संमेलनाध्यक्षपद देऊन कुणी काही म्हणो, ‘आम्ही कुणाला जुमानत नाही’, हेच या निमित्ताने दाखवून दिले. आता साहित्यिक, मराठीप्रेमी यांचे दायित्व वाढले असून संमेलनाच्या व्यासपिठाचा उपयोग धर्मविरोधकांच्या उदात्तीकरणासाठी करणारे संयोजक-आयोजन यांना खडसावून असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कंबर कसण्याची वेळ आली आहे.
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर