आज आळंदी (पुणे) येथे राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन !
पुणे – खेड तालुक्यातील देविदास धर्मशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा आळंदी देवाची येथे १ डिसेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाचे हे १६ वे वर्ष असून या कार्यक्रमामध्ये सकल संत चरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळाही असणार आहे. या कार्यक्रमामध्ये हिंदु धर्मगुरु तथा मार्गदर्शक परम श्रद्धेय कालीपुत्र कालीचरणजी महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, हिंदुभूषण शामजी महाराज (वृंदावन धाम) आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. पराग गोखले आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
महाअधिवेशनात पुढील विषयांवर ठराव संमत करण्यात येणार आहेत.
१. देव, संत, व्रत, ग्रंथ, हिंदुधर्म यांचा अपमान, विडंबन करणार्यांविरुद्ध कठोर कायदा करावा.
२. गायरान भूमीवरील अतिक्रमण हटवून त्या भूमी गोवंश संगोपनासाठी संरक्षित कराव्यात.
३. धर्मांतर बंदी कायदा करून धर्मांतर केलेल्या लोकांची चौकशी करून ते लाटत असलेल्या सवलती बंद कराव्यात.
४. पोलीसांवर आक्रमण करणारे, दंगली घडवणारे, तसेच गुंडगिरीच्या माध्यमातून समाजात दहशत निर्माण करणार्यांविरुद्ध कठोर कायदा करावा.
५. कठोर जनसंख्या नियंत्रण कायदा अमलात आणावा.
राष्ट्र्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति शास्त्री तुनतुने, देविदास धर्मशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर हे उपस्थित रहाणार आहेत, तसेच विश्व हिंदू परिषद, देवगिरी प्रांताचे अध्यक्ष मा. श्री. संजय अप्पाजी बारगजे, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष मा. श्री. नितीन (दादा) चौगुले, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष ह.भ.प. ओमदेव महाराज चौधरी, समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष ह.भ.प. नवनाथ महाराज शिंदे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.