कामावर रुजू होऊ इच्छिणार्या कर्मचार्यांना अडवू नका, अन्यथा गुन्हे नोंद करणार ! – भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक
सातारा, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – कामावर रुजू होऊ इच्छिणार्या एस्.टी. कर्मचार्यांना अडवू नका, अन्यथा असे करणार्यांवर गुन्हे नोंद करण्यात येतील, अशी चेतावणी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा बस स्थानकातील आंदोलनकर्त्या अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली.
गत अनेक दिवसांपासून एस्.टी. कर्मचार्यांचे आंदोलन चालू आहे. काही दिवसांपूर्वी कामावर रुजू होण्याच्या कारणावरून दोन कर्मचार्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती. एस्.टी. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार यांची मोठी हानी झाली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही एस्.टी. कर्मचारी कामावर रुजू होत आहेत; मात्र आंदोलनकर्त्या कर्मचार्यांकडून त्यांना अटकाव केला जात आहे. याची नोंद घेत शहर पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी सातारा बस स्थानकाला भेट दिली. या वेळी निंबाळकर यांनी आंदोलनकर्त्या अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावर रुजू होऊ इच्छिणार्या कर्मचार्यांना अटकाव न करण्याच्या सूचना दिल्या.