संभाजीनगर येथे आत्महत्या केलेल्या तलाठ्याची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी पोलिसांनी दडवून ठेवली !

  • चिठ्ठी लपवणार्‍या पोलिसांवर अधिक कडक कारवाई केली पाहिजे ! पोलीस खात्यात असे भ्रष्ट, निष्क्रीय आणि दबावाखाली रहाणारे पोलीस असल्यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास पूर्ण उडालेला आहे ! – संपादक

  • यातून पोलीस गुन्हेगारांची साथ देऊन निष्पाप बोराटे यांच्या कुटुंबियांचा मानसिक छळ करत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पालकमंत्री यांनी याकडे लक्ष देऊन बोराटे कुटुंबियांना न्याय मिळवून दिला पाहिजे ! – संपादक

  • दबावामुळे सत्य दडपणारे पोलीस सर्वसामान्यांना कधी आधार वाटतील का ? – संपादक 
तलाठी लक्ष्मण बोराटे

संभाजीनगर – अनधिकृत कामे करण्यासाठी वरिष्ठांकडून वारंवार येणारा दबाव आणि सतत होणारा छळ याला कंटाळून येथील तलाठी लक्ष्मण बोराटे (वय ३६ वर्षे) यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठीत त्रास देणारे महसूल विभाग आणि तलाठी कार्यालयातील एकूण १३ वरिष्ठ अधिकारी, त्यांचे सहकारी अन् तलाठी संघटना यांची नावे लिहिली असल्याची माहिती आहे; मात्र पोलिसांनी ही चिठ्ठी दडवून ठेवली. ‘ती’ नावे जाणून घेण्यासाठी रात्री विलंबापर्यंत बोराटे कुटुंबीय सातारा पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते; मात्र पोलिसांकडून संबंधित अधिकार्‍यांचा बचाव केला जात आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला.

कुटुंबाच्या माहितीनुसार प्रशासकीय अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून यापूर्वी बोराटे यांनी नोकरीचेही त्यागपत्र दिले होते; पण वरिष्ठांनी तेही फेटाळले. त्यामुळे त्रस्त झालेले बोराटे यांनी अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आधी चिठ्ठी वाचायला देण्याचे आश्वासन दिलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी नंतर शब्द फिरवत ती कुटुंबियांच्या हातात देण्यासही नकार दिला. ‘आम्ही चिठ्ठी वाचून दाखवतो,’ असे म्हणत त्यांनी केवळ पत्नीलाच चिठ्ठी वाचून दाखवली; मात्र चिठ्ठी शेवटपर्यंत हातात दिली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आधी चिठ्ठी देण्याच्या सिद्धतेत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना काहींचे दूरभाष आल्यानंतर त्यांनी अचानक घूमजाव केले. सायंकाळपर्यंत पोलिसांनी बोराटे यांची पत्नी आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य यांना ती चिठ्ठी दाखवली नव्हती. (खरेतर पोलिसांनी तत्त्वनिष्ठ आणि कर्तव्याशी एकनिष्ठ राहून काम करायला हवे. इतरांच्या दबावाखाली येऊन काम करणार्‍या पोलिसांना जनतेचे रक्षक म्हणता येईल का ? – संपादक) शवविच्छेदनानंतर कुटुंबाने चिठ्ठीची दाखवण्याची आणि त्यातील नावे असलेल्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कृती का करत नाहीत ?’ – संपादक) ‘त्याशिवाय मृतदेह कह्यात घेणार नाही’, अशी चेतावणीही दिली. त्यानंतर पोलिसांनी ‘आम्ही त्या चिठ्ठीनुसार कारवाई करतो’, असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह कह्यात घेत त्याच्यावर रात्री अंत्यसंस्कार केले.