परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलांमधील नकारात्मक स्पंदने नामजपादी उपाय करून दूर केल्यावर त्या चपलांमधील सकारात्मक स्पंदने अनुभवतांना सुचलेले काही प्रयोग आणि त्यांच्या मिळालेल्या उत्तरांचे केलेले विश्लेषण
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
‘मनुष्याच्या जीवनात येणार्या ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे आलेल्या असतात. अशा समस्या सुटण्यासाठी साधना करण्याची आवश्यकता असते. साधनेच्याच जोडीला समस्यांच्या त्या त्या प्रसंगांच्या वेळी त्या त्या समस्येवर नामजपादी उपाय शोधून ते करण्याचीही आवश्यकता असते. सध्या धर्माचरणाचा र्हास झाल्याने आलेल्या आपत्काळामध्ये वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे सत्कार्यामध्ये विघ्ने आणून त्यांचे त्रास देण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजाभिमुख सत्कार्य करणार्या, म्हणजे समष्टी साधना करणार्या सनातनच्या साधकांना सध्या अशा त्रासांची वारंवार प्रचीती येत आहे. त्यामुळे कोणतेही सत्कार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी आधीच नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत. तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रतिदिन करत असलेल्या व्यष्टी साधनेमध्येही साधकांना वाईट शक्ती वारंवार त्रास देत आहेत. त्यासाठीही साधकांना नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत.
वाईट शक्तींच्या त्रासांवर नामजपादी उपाय करणे म्हणजे त्यांच्याशी एकप्रकारे लढणेच असते. पाचव्या, सहाव्या पाताळांतील वाईट शक्तींची शक्ती पुष्कळ असल्याने त्यांच्याशी लढणे, म्हणजे आपल्या जिवावर बेतण्याएवढे धोकादायक असते, तरीही गुरूंचे संरक्षककवच आणि देवाची कृपा यांमुळेच मी ही सेवा करू शकत आहे. या सेवेतील माझे विविध अनुभव, मला शिकायला मिळालेली सूत्रे, मी नामजपादी उपाय केलेल्या साधकांच्या अनुभूती हे लिखाण या लेखमालेत देत आहे. ‘हे लिखाण वाचून साधना, नामजपादी उपाय आणि गुरुकृपा यांचे जीवनातील महत्त्व सर्वांच्या मनावर बिंबो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.८.२०२१)
‘२२.६.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले आश्रमात वापरत असलेल्या चपलांमध्ये नकारात्मक स्पंदने असल्याचे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे लक्षात आले. असे असले, तरी त्या चपलांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदनेही होती. त्या चपला नामजपादी उपाय करून त्यांच्यातील नकारात्मक स्पंदने दूर करण्यासाठी माझ्याकडे देण्यात आल्या.
मी त्या चपलांवरील आवरण दूर केले, तसेच हाताची पाचही बोटे एकत्र करून ती त्या चपलांच्या टाचेकडील भागाच्या समोर १ – २ सें.मी. अंतरावर ठेवून आणि ध्यान लावून त्या चपलांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित केली. मी ‘चपलांवरील आवरण काढणे आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणे’, असे ३ – ४ वेळा केल्यावर चपलांमधील नकारात्मक ऊर्जा पूर्णतः जाऊन त्यांच्यामध्ये पूर्णतः सकारात्मक ऊर्जा आल्याचे माझ्या लक्षात आले. २४.६.२०२१ या दिवशी ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीमध्येही चपलांमधील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आधीपेक्षा वाढल्याचे लक्षात आले. (त्या संदर्भातील आकडे शेवटी सारणीत दिले आहेत.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलांमधील सकारात्मक स्पंदने अनुभवतांना मला पुढील प्रयोग सुचले. हे सर्व प्रयोग करतांना मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चप्पल उजव्या हातात घेऊन प्रयोग केले.
१. उजव्या पायातील चप्पल हातात घेणे
१ अ. चपलेचा टाचेकडील भाग आपल्याकडे आणि बोटांकडील भाग आपल्या विरुद्ध दिशेला ठेवून ती उजव्या हातात घेणे
१ अ १. जाणवलेली स्पंदने : माझी सूर्यनाडी कार्यरत झाली. तसेच चपलेतील सकारात्मक स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रावर जाणवली.
१ अ २. विश्लेषण
१ अ २ अ. उजवीकडील चप्पल हातात धरल्यावर सूर्यनाडी कार्यरत होण्याचे कारण : चप्पल घालणार्याची स्पंदने त्याच्या चपलेमध्ये येतात. मनुष्याच्या उजवीकडील भागात सूर्यनाडी कार्यरत असते. त्यानुसार उजवीकडील चप्पल हातात धरल्यावर माझी सूर्यनाडीच कार्यरत झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
१ अ २ आ. चपलेच्या बोटांकडील भागापेक्षा टाचेकडील भागाकडून पुष्कळ अल्प प्रमाणात स्पंदने प्रक्षेपित होणे : मनुष्याच्या पायाच्या बोटांकडून त्याच्यातील ऊर्जा समष्टीकडे प्रक्षेपित होत असते; पण टाचेकडून ऊर्जा समष्टीकडे प्रक्षेपित होण्याचे प्रमाण त्या तुलनेत अगदी अल्प असते. मी चपलेचा टाचेकडील भाग माझ्याकडे केला असल्याने तेथील थोड्याफार ऊर्जेची स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रावर जाणवली.
१ आ. चपलेचा बोटांकडील भाग आपल्याकडे आणि टाचेकडील भाग आपल्या विरुद्ध दिशेला ठेवून ती उजव्या हातात घेणे
१ आ १. जाणवलेली स्पंदने : माझी सूर्यनाडी कार्यरत झाली. तसेच चपलेतील सकारात्मक स्पंदने मला माझ्या सहस्रारचक्रावर जाणवली.
१ आ २. विश्लेषण
१ आ २ अ. चपलेच्या बोटांकडील भागाकडून प्रक्षेपित होणार्या ऊर्जेने सर्व चक्रांना आणि शेवटी सहस्रारचक्राला कार्यरत करणे : मनुष्याच्या बोटांतून त्याच्यातील ऊर्जेचे समष्टीकडे प्रक्षेपण होत असल्याने चपलेचा बोटांकडील भाग माझ्या दिशेने पकडल्यावर मला ‘चपलेतून प्रक्षेपित होणार्या कार्यरत ऊर्जेने माझ्या सर्व चक्रांना चालना दिली आणि शेवटी सहस्रारचक्रही कार्यरत केले’, असे जाणवले. ‘माझ्या सहस्रारचक्रातून चपलेतील स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत आहेत’, असेही मला जाणवले.
१ आ २ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलेमध्ये कुंडलिनीशक्ती जागृत करून चैतन्य प्रवाहित करण्याचे सामर्थ्य असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलेची स्पंदने मला माझे मूलाधारचक्र किंवा सहस्रारचक्र यावर जाणवण्याचे कारण म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक स्तराची उच्चता ! एखाद्या स्पंदनांनी मूलाधारचक्र किंवा सहस्रारचक्र जागृत होणे, म्हणजे त्या स्पंदनांमध्ये कुंडलिनीशक्ती जागृत करून चैतन्य प्रवाहित करण्याचे सामर्थ्य असणे.
२. डाव्या पायातील चप्पल हातात घेणे
२ अ. चपलेचा टाचेकडील भाग आपल्याकडे आणि बोटांकडील भाग आपल्या विरुद्ध दिशेला ठेवून ती उजव्या हातात घेणे
२ अ १. जाणवलेली स्पंदने : माझी चंद्रनाडी कार्यरत झाली. तसेच चपलेतील सकारात्मक स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रावर जाणवली.
२ अ २. विश्लेषण
अ. मनुष्याच्या डावीकडील भागात चंद्रनाडी कार्यरत असल्याने डावीकडील चप्पल हातात धरल्यामुळे माझी चंद्रनाडी कार्यरत झाली.
आ. मी चपलेचा टाचेकडील भाग माझ्याकडे केला असल्याने तेथून अगदी अल्प प्रमाणात प्रक्षेपित होणार्या ऊर्जेच्या स्पंदनांचा परिणाम माझ्या मूलाधारचक्रावर झाला.
२ आ. चपलेचा बोटांकडील भाग आपल्याकडे आणि टाचेकडील भाग आपल्या विरुद्ध दिशेला ठेवून ती उजव्या हातात घेणे
२ आ १. जाणवलेली स्पंदने : माझी चंद्रनाडी कार्यरत झाली. तसेच चपलेतील सकारात्मक स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रावर जाणवली.
२ आ २. विश्लेषण – चंद्रनाडीमुळे डाव्या पायातील चपलेमधील सुप्त ऊर्जेची स्पंदने केवळ मूलाधारचक्रावर जाणवणे : मनुष्याच्या उजव्या भागातील सूर्यनाडीतील ऊर्जा ही पुष्कळ प्रमाणात कार्यरत असते. याउलट डाव्या भागातील चंद्रनाडीतील ऊर्जा ही सुप्त असते. त्यामुळे मी डाव्या पायातील चपलेचा बोटांकडील भाग माझ्याकडे केला असूनही तेथील सुप्त ऊर्जा मला माझ्या केवळ मूलाधारचक्रावर जाणवली.
३. डाव्या आणि उजव्या पायांतील चपला एकत्र ठेवून ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजलेली त्यांच्यातील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा
चपलांवर नामजपादी उपाय केल्यानंतर चपलांचा बोटांकडील भाग पुढे ठेवून आणि टाचेकडील भाग पुढे ठेवून असे दोन्ही प्रकारे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण केले. त्यावरून पुढील सूत्रे लक्षात येतात.
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलांवर नामजपादी उपाय केल्यावर त्यांच्यामधील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढली.
३ आ. चपलांचा टाचेकडील भाग पुढे ठेवून मिळालेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ही चपलांचा बोटांकडील भाग पुढे ठेवून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीपेक्षा ६० मीटरने अधिक असणे : सर्वसाधारणपणे पायाच्या टाचेकडील भागापेक्षा बोटांकडील भागातून ऊर्जा प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते; पण परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेले समष्टी गुरु असल्याने त्यांच्या संदर्भात असे वेगळे दिसून आले. याचे मला जाणवलेले कारण म्हणजे, आता ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे सूक्ष्मातील कार्य अंतिम टप्प्याकडे चालले असल्याने वाईट शक्तींशी चाललेला लढा सातव्या पाताळापर्यंत पोचला आहे. आता वाईट शक्ती समोरून आक्रमणे करण्यापेक्षा पाठीमागून अधिक प्रमाणात आक्रमणे करतात. ‘या आक्रमणांना थोपवण्यासाठी आता काळानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या टाचेकडून अधिक प्रमाणात ऊर्जा प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले आणि तेच त्यांच्या चपलांच्या संदर्भात लक्षात आले. मला मात्र चपलांचे प्रयोग करतांना तशी अनुभूती आली नाही; कारण सर्वांनाच तशी स्पंदने जाणवतील असे नाही. ‘यू.ए.एस्.’ उपकरणाने मात्र ते निदर्शनास आणून दिले. यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य सर्व पैलू लक्षात घेऊन व्यापक स्तरावर कसे चालू आहे’, हे कळते.
४. सारांश
अ. आपल्या उजव्या पायातील चपलेमध्ये आपल्या सूर्यनाडीचा आणि डाव्या पायातील चपलेमध्ये आपल्या चंद्रनाडीचा प्रभाव पडतो.
आ. चपलांचा बोटांकडील भाग आणि टाचेकडील भाग यांची तुलना केल्यास बोटांकडील भागातून स्पंदनांचे प्रक्षेपण सर्वाधिक प्रमाणात होत असल्याचे सूक्ष्मातून जाणवत असले, तरी ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण केल्यावर चपलांच्या टाचेकडील भागातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असल्याचे लक्षात आले.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.७.२०२१)
|