‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाद्वारे सनातनची साधिका चि. सौ. का. वैष्‍णवी यांच्‍या विवाहाच्‍या लग्‍नपत्रिकेची केलेली वैज्ञानिक चाचणी

सौ. मधुरा कर्वे

‘मुला-मुलींच्या विवाहाच्या वेळी नातलग, मित्र-मैत्रिणी आणि समाजातील परिचित लोक या सर्वांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका छापल्या जातात. आजकाल समाजामध्ये लग्नपत्रिकेच्या संदर्भात अत्यंत आकर्षक दिसणार्‍या कलाकृती निवडण्याकडे सर्वांचा कल दिसून येतो. सनातनचे साधक मात्र ‘प्रत्येक कृतीतून साधना व्हावी’, या सात्त्विक उद्देशाने त्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाच्या वेळी सात्त्विक लग्नपत्रिका छापतात.

सनातनचे साधक श्री. विष्णु जाधवकाका आणि त्यांच्या पत्नी सनातनच्या संत पू. (सौ.) संगिता जाधवकाकू यांची कन्या चि. सौ. का. वैष्णवी यांच्या १.१२.२०२१ या दिवशी विवाह आहे. त्यांच्या विवाहाच्या लग्नपत्रिकेतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. तिच्या विवाहाच्या लग्नपत्रिकेची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. तुलनेसाठी म्हणून समाजातील एका व्यक्तीच्या विवाहाच्या लग्नपत्रिकेचीही चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. विवाहाच्या लग्नपत्रिकांची ‘यू.ए.एस्.’ निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण


वरील निरीक्षणांतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१ अ. समाजातील व्यक्तीच्या लग्नपत्रिकेत सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून येणे : या लग्नपत्रिकेची संरचना आणि रंगसंगती आकर्षक आहे. लग्नपत्रिकेची रंगसंगती करतांना त्यात विटकरी, तपकिरी इत्यादी रंगांचा उपयोग केला आहे. लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर गणेशाचे विडंबनात्मक चित्र आहे. आतील पानावर डाव्या बाजूला काही मजकूर इंग्रजीत असून त्यातील अक्षरांचा ‘फॉन्ट’ (संगणकीय अक्षरे) असात्त्विक आहे. उर्वरित मजकूर मराठीत आहे. लग्नपत्रिकेतील आतील पृष्ठांना बाजूने घातलेली किनार (नक्षी) असात्त्विक आहे. एकूणच पत्रिकेशी संबंधित बहुतांश घटक असात्त्विक असल्याने पत्रिकेतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत. यातून सदर लग्नपत्रिका डोळ्यांना जरी आकर्षक वाटत असली, तरी तिच्यातून आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, असे लक्षात आले.

१ आ. सनातनच्या साधिकेच्या लग्नपत्रिकेत नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून येणे : या लग्नपत्रिकेची संरचना सुटसुटीत आहे. लग्नपत्रिकेची रंगसंगती सात्त्विक असून त्यात निळा, पिवळा यांसारख्या सात्त्विक रंगांचा उपयोग केला आहे. लग्नपत्रिकेत मराठी भाषेतील मजकूर असून त्याच्या अक्षरांचा ‘फॉन्ट’ (संगणकीय अक्षरे) सात्त्विक आहे. लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर भगवान श्रीकृष्णाचे सनातन-निर्मित सात्त्विक चित्र आहे. आतील पानावर विवाहाच्या मजकूरासह श्री गणेशाचे सनातन-निर्मित सात्त्विक चित्र, मंगल कलश आणि सनई-चौघडा यांची चित्रे आहेत. निमंत्रण पत्रिकेच्या सर्व पृष्ठांवर चारही बाजूनी झेंडुची फुले आणि आंब्याच्या पानांच्या तोरणाची सात्त्विक नक्षी आहे. निमंत्रण पत्रिकेच्या मलपृष्ठावर ‘कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व’ आणि ‘श्री गुरूदेव दत्त ।’ नामजपाची माहिती छापली आहे. ही माहिती वाचून समाजातील लोकांमध्ये साधनेचे बीज रूजेल. एकूणच या लग्नपत्रिकेशी संबंधित सर्वच घटक सात्त्विक असल्याने पत्रिकेतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत. या लग्नपत्रिकेची संरचना सनातनच्या रामनाथी आश्रमातील कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी केली आहे. सनातनच्या साधिकेच्या विवाहाची लग्नपत्रिका सात्त्विक असून तिच्यातून आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. या लग्नपत्रिकेतून समाजात अध्यात्माचा प्रसार होण्यासह समाजाला सात्त्विकतेचाही लाभ होतो.

१ इ. विवाहाच्या लग्नपत्रिकेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अवलंबून असणारे घटक : विवाहाच्या लग्नपत्रिकेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अनेक घटकांवर अवलंबून असतात. हे घटक जेवढे सात्त्विक किंवा असात्त्विक असतील तेवढी त्या लग्नपत्रिकेतून सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. पुढील सारणीतून सनातनच्या साधिकेच्या विवाहाच्या लग्नपत्रिकेतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारणे लक्षात येतील.

थोडक्यात, कोणत्याही गोष्टीचा उद्देश सात्त्विक असल्यास, तसेच तिच्याशी संबंधित अधिकाधिक घटक सात्त्विक असल्यास त्या गोष्टीकडे चैतन्य आकृष्ट होऊन ते प्रक्षेपित होते. हे लक्षात घेऊन प्रत्येक कृती सात्त्विक करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.११.२०२१)

ई-मेल : mav.research2014@gmail.com