जगातील १३ देशांमधून येणार्या प्रवाशांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन घातक प्रकारामुळे जगातील अतिगंभीर अशा १३ देशांमधून राज्यात येणार्या प्रवाशांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोग्यमंत्री म्हणाले…
१. दक्षिण आफ्रिकेतून येणार्या प्रवाशांची ७२ घंट्यांपूर्वीची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी नकारात्मक असणे बंधनकारक आहे. या प्रवाशांचे कठोरपणे स्क्रिनिंग आणि तपासणी करण्यात येईल.
२. या देशातून येणार्या उड्डाणावर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला कळवले आहे.
३. विदेशातून लोक मोठ्या प्रमाणात मुंबईसह इतर ठिकाणी येत आहेत. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान, रस्ते आणि रेल्वे यांमार्गे जात आहेत. त्यांच्यामध्ये कुणी या विषाणूचा वाहक असेल, तर इतरांसाठी मोठा धोका होऊ शकतो.
४. ओमिक्रॉनचा संसर्गवेग ५ पटींनी अधिक असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.
५. या पार्श्वभूमीवर पुणे, नागपूर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित १३ देशांतून आलेल्या प्रवाशांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार आहे. या प्रवाशांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी घेतली जाणार आहे. हीच चाचणी ८ दिवसांनंतर दुसर्यांदा घेतली जाणार आहे.
६. देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणार्या विमानतळावरही प्रवाशांची तपासणी करण्यात येईल. त्यांचा ४८ घंट्यांपूर्वीचा नकारात्मक (निगेटिव्ह) चाचणी अहवाल पाहिला जाईल.
७. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यासह बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे १ डिसेंबर या दिवशीच शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.