हिवाळी अधिवेशन मुंबईत; कामकाज केवळ ५ दिवसच चालणार !
मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. यामध्ये २५ आणि २६ डिसेंबर या दिवशी सुट्टी आहे. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज केवळ ५ दिवसच चालणार आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या अधिवेशनात १२ विधेयके सभागृहात मांडण्यात येणार आहेत. यासह तारांकित प्रश्न, लक्षवेधी मांडण्यात येतील. २४ डिसेंबर या दिवशी कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार असून यामध्ये ‘अधिवेशनाचा कालावधी आणखी वाढवायचा का ?’, याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. ‘अधिवेशन किमान २ आठवडे घेण्यात यावे, तसेच अधिवेशन नागपूर येथे घ्यावे’, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशन मुंबईत घेण्याचे निश्चित करण्यात आले. याविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, अधिवेशन मुंबईमध्ये घेण्यात आले, तर मुख्यमंत्री प्रत्यक्ष या अधिवेशनाला उपस्थित रहाणार आहेत का ? ‘अधिवेशन नागपूर किंवा मुंबई दोन्ही ठिकाणी असले, तरी मुख्यमंत्री अधिवेशनाला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाणार असतील, तर अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे’, अशी आम्ही भूमिका घेतली. यावर मुंबई येथे अधिवेशन घेतल्यास मुख्यमंत्री अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित रहाणार आहेत, असे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
३ दिवसांत १२ विधेयकांना न्याय कसा देणार ?
या अधिवेशनात १२ विधेयके चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहेत. अधिवेशनात २ दिवस सुट्टी आहे. उर्वरित ५ दिवसांपैकी पहिला दिवशी कामकाज होत नाही. १ दिवस पुरवणी मागण्या, यांमुळे विधेयकांवर चर्चा करण्यासाठी केवळ ३ दिवसच असणार आहेत. त्यामध्येही तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी असल्यामुळे १२ विधेयकांवर चर्चा करण्यासाठी किती वेळ मिळणार, हा प्रश्नच आहे.