५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कल्याण (जिल्हा ठाणे) येथील कु. मनुश्री अजय भारंबे (वय १६ वर्षे ) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मनुश्री अजय भारंबे ही या पिढीतील एक आहे !

कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (३०.११.२०२१) या दिवशी कु. मनुश्री अजय भारंबे हिचा १६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि जन्मानंतर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. मनुश्री भारंबे

कु. मनुश्री अजय भारंबे हिला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. गर्भधारणा होण्यापूर्वी

कोणतेही शारीरिक दोष नसतांनाही लग्नानंतर ४ वर्षे गर्भधारणा न होणे आणि तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्यावर गर्भधारणा होणे : ‘माझे यजमान श्री. अजय भारंबे आणि त्यांचे आई-वडील हे सर्व सात्त्विक वृत्तीचे आहेत. आम्हा दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे शारीरिक दोष नसतांनाही मला लग्नानंतर ४ वर्षे दिवस राहिले नव्हते. आम्ही सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या. त्या सर्वसामान्य होत्या. आम्हा दोघांना पितृदोष होता. आमच्या लग्नानंतर ३ वर्षांनी माझ्या सासूबाईंचे मस्तिष्कघाताने अकस्मात् निधन झाले. त्यानंतर माझ्या सासर्‍यांनी दुसरा विवाह केला. माझ्या दुसर्‍या सासूबाई आणि सासरे यांनी काशी, प्रयाग, गया आणि बद्रीनाथ अशा तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केले. त्यांनी गंगासागरला जाऊन पिंडदान केले. त्यानंतर मला गर्भधारणा झाली.

२. गर्भधारणा झाल्यावर

सौ. सोनाली भारंबे

२ अ. स्तोत्रे म्हणणे आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन अन् नामजप करणे : मी गर्भावर चांगले संस्कार होण्यासाठी ‘रामरक्षा, मारुति स्तोत्र, दत्तात्रेय स्तोत्र म्हणणे, नवनाथांची पोथी वाचणे, धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, ‘मनःशक्ती’ची गर्भसंस्कारांची ध्वनीचित्र-चकती ऐकणे, तसेच श्री स्वामी समर्थांचा नामजप करणे’, अशा कृती करत होते.

२ आ. कोणतेही कारण नसतांना गादी सरकून पलंगावरून पडणे आणि ईश्वराच्या कृपेने स्वतःला अन् बाळाला काही न होणे : या घटनेनंतर आम्ही इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात साधनेसाठी १० दिवसांच्या कार्यशाळेसाठी गेलो होतो. तेथे पहिल्याच दिवशी काहीही कारण नसतांना पलंगावरील गादी सरकून मी पलंगावरून खाली पडले. ईश्वराच्या कृपेने बाळाला आणि मला काही झाले नाही. तेव्हा ‘ईश्वर आपले आणि बाळाचे रक्षण करत आहे’, हे माझ्या लक्षात आले.

३. जन्म ते १ वर्ष 

अ. मनुश्री अतिशय शांत आणि हसरी होती.

आ. तिचा तोंडवळा आणि डोळे फार तेजस्वी होते.

४. वय १ ते ३ वर्षे

अ. मला नोकरी लागल्यामुळे आम्ही तिला पाळणाघरात ठेवू लागलो. तेथेही सात्त्विक वातावरण होते. तेथे तिच्यावर संध्याकाळी परवचा म्हणण्याचे संस्कार झाले.

आ. तिने कधीच कुठलाच हट्ट केला नाही.

इ. ती देवाला आणि वडीलधार्‍या व्यक्तींना नियमित नमस्कार करत असे.

ई. ती रात्री दचकून उठायची. तिला लहानपणापासूनच पाण्याची फार भीती वाटायची. त्यामुळे ती पोहायला घाबरायची.

५. वय ३ ते ५ वर्षे

५ अ. धाडसी असलेली मनुश्री ! : ती २ वर्षांची असतांनाच तिच्या वडिलांनी तिच्याकडून आमचे भ्रमणभाष क्रमांक पाठ करवून घेतले होते. एकदा आम्ही सर्व माझ्या भावाच्या कुटुंबाच्या समवेत कल्याणच्या बाजारात खरेदीसाठी गेलो होतो. त्या वेळी तिची आणि आमची चुकामूक झाली. आम्ही सर्व तिला शोधत होतो. तेवढ्यात एका व्यक्तीचा भ्रमणभाष आला, ‘‘तुमची मुलगी आमच्याजवळ खेळ बघत उभी आहे.’’ त्या व्यक्तीने तिचे पुष्कळ कौतुक केले. ती म्हणाली, ‘‘एवढी लहान मुलगी असून तिला तिच्या आई-वडिलांचा भ्रमणभाष क्रमांक लक्षात होता. ती किती धीट आहे ! एवढ्या लहान वयातही तिला हे कसे सुचले असेल ?’’ या वेळी ईश्वरानेच तिचे रक्षण केले.

६. वय ५ ते १० वर्षे 

६ अ. मनुश्रीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सांभाळायला ठेवल्यावर तिच्यावर धार्मिकतेचे संस्कार होणे : वयाच्या ५ व्या वर्षापासून तिला तिच्या शाळेतील वर्गमैत्रिणीच्या घरी सांभाळायला ठेवले होते. त्यांच्या घरातील सर्व जण सात्त्विक आणि धार्मिक होते. त्या मुलीचे वडील या दोघींकडून मनाचे श्लोक आणि संस्कृत मंत्र म्हणवून घेत. ते दोघींना घेऊन मंदिरांमध्ये जात असत.

६ आ. मनुश्रीला लहानपणापासूनच दुसर्‍यांच्या इच्छेप्रमाणे वागावे लागल्याने ती परिस्थितीशी जुळवून घेते.

६ इ. ती तिच्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवायची. तिला चित्रकला अतिशय आवडत असे. ती तिचे शाळेचे दप्तर स्वतःच भरायची. तिला सर्व विषयांमध्ये चांगले गुण मिळत असत.

७. वय १० ते १४ वर्षे

७ अ. ध्यान लावणे आणि नामजप करणे : मनुश्री नियमित चक्रध्यान (प्रत्येक चक्राचे बीजमंत्र म्हणून ध्यान लावणे) करत असे. तेव्हापासून आम्हाला चेतन आणि अवचेतन मनाचे सिद्धांत कळले. तिला ध्यानात कधी सात्त्विक, तर कधी असात्त्विक रंग दिसत असत. आम्ही ‘रेकी’च्या वर्गाला जायचो. ‘रेकी’च्या मार्गदर्शक सौ. शीतल शाह यांना सूक्ष्म शक्तीचे ज्ञान असल्याने त्यांनी तिचे सूक्ष्म परीक्षण केले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘हिने नियमित साधना केली, तर हिची आध्यात्मिक ऊर्जा चांगली होईल.’’ त्यांनी तिला चक्रध्यानाच्या समवेत नामजपही करायला सांगितला. तेव्हापासून मनुश्री नामजप करू लागली.

७ आ. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यापासून मनुश्रीत झालेले पालट : वर्ष २०१५ मध्ये आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात आलो.

१. सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर सांगितल्याप्रमाणे मनुश्री पाश्चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरा करत नाही.

२. तिचे शिक्षण इंग्रजीत झाले आहे. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात राहिल्याने तिची मराठी भाषा सुधारली आहे.

३. तिला सात्त्विक कपडे आवडतात. ती आधी ‘जीन्स’ घालत होती; पण तिने ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळावर त्याचे दुष्परिणाम वाचल्यावर ‘जीन्स’ वापरणे सोडले.

७ इ. देवद आश्रमात राहिल्यावर मनुश्रीला शिकायला मिळालेली सूत्रे : मनुश्रीला देवद आश्रमात गेल्यावर सात्त्विकता अनुभवायला मिळाली. तिला आश्रमात आल्यावर स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया समजली. ‘क्षमा मागणे, मनातील प्रतिक्रियांकडे लक्ष देणे, त्यांसाठी प्रायश्चित्त घेणे, प्रतिदिन नियोजन करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे, स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला जाणे’, हे सर्व ती नियमित करू लागली.

७ ई. तिला दैवी बालकांच्या सान्निध्यात रहायला आवडते.

७ उ. वर्ष २०१६ मध्ये आम्हाला गुरुपौर्णिमेची सेवा होती. तेव्हा मनुश्रीसुद्धा इतर बालसाधिकांच्या समवेत सेवा करत होती. तेव्हा मनुश्री पूर्ण दिवस आनंदी आणि प्रसन्न होती.

८. स्वभावदोष

आळशीपणा, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघणे आणि आत्मविश्वासाचा अभाव.’

– सौ. सोनाली भारंबे (आई), कल्याण, ठाणे. (वर्ष २०२०)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck  मार्गिकेवरही पाहू शकता.