‘निर्विचार’ या नामजपाच्या संदर्भात साधिकेला मिळालेली पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती !
‘सध्याच्या जपाचे कार्य संपले आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले ‘निर्गुण’ असा जप सांगतील’, असे देवाने सुचवणे आणि काही दिवसांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’ हा जप करण्याविषयीची सूचना वाचल्यावर मनातील विचारांचा उलगडा होणे
‘११.५.२०२१ आणि १२.५.२०२१ या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी ध्यानासाठी (समष्टी जपासाठी) बसले असतांना माझा जप नीट होत नव्हता. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘२ दिवसांपासून जप नीट का होत नाही ?’ त्या वेळी आतून देवच सांगत असल्याप्रमाणे माझ्या मनात त्याचे पुढील उत्तर आले, ‘आता काही दिवसांनी हा जप करायचा नसणार. या जपाचे कार्य संपले आहे. आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले समष्टी जपाच्याही पलीकडे नेणार आहेत. ते आपल्याला निर्गुणात नेण्याचा ‘निर्गुण’ असा जप सांगतील. आता आपत्काळ चालू झाल्याने ते आपल्याला साक्षीभावाच्या टप्प्याला नेतील.’ १६.५.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’ हा जप करण्याविषयीची सूचना वाचली. त्या वेळी मला काही दिवसांपूर्वी आलेल्या विचारांचा अर्थ समजला.’
स्वप्नात स्वतः ‘निर्विचार’ हा जप करत असल्याचे दिसणे, त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेच्या डोक्यावर हात ठेवल्यावर तिच्या सहस्रारचक्रातून प्रकाश बाहेर पडणे, त्या गेल्यावर आतून आनंदाच्या उकळ्या फुटून ध्यानही लागणे
‘२०.५.२०२१ या रात्री मी ‘निर्विचार’ हा जप करून झोपले. झोपेत मला पुढील स्वप्न पडले, ‘मी एका ठिकाणी बसून ‘निर्विचार’ जप करत आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तेथे आल्या आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवले. त्या वेळी माझ्या सहस्रारचक्रातून प्रकाश बाहेर आला. त्या त्यांचे हात जसजसे वर नेत होत्या, तसतसा प्रकाशही वर जात होता. त्यानंतर त्या तेथून गेल्या. मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ती एक वेगळीच स्थिती होती. मला आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि त्याच वेळी ध्यानही लागले होते. ‘ती अवस्था शब्दांत मांडता येणार नाही’, अशी होती. नंतर मला अकस्मात् जाग आली; पण जाग आल्यावरही मला काही क्षण ती स्थिती अनुभवता आली. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते. तेव्हा मला आतून शांत वाटत होते.’
– कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |