मागील १७ वर्षांत मुंबई महानगरपालिकेतील ५७ लाचखोर कर्मचार्‍यांना कामावरून काढले !

मुंबई महानगरपालिका

मुंबई – वर्ष २००५ ते २०२१ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत लाच घेणार्‍या ५७ कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये २०० रुपयांपासून ते २ लाख ७५ सहस्र रुपयांपर्यत लाच घेतल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकाराखाली ही माहिती प्राप्त झाली आहे.

याविषयी जितेंद्र घाडगे म्हणाले की, अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे अवैध संपत्ती आहे; मात्र तक्रारदार स्वत:चे नाव उघड होण्याला घाबरत असल्याने ते तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्व कर्मचार्‍यांना प्रतिवर्षी त्यांच्या संपत्तीचा तपशील सादर करणे बंधनकारक केले पाहिजे, तसेच भ्रष्ट अधिकार्‍यांना पकडण्याची अंतर्गत यंत्रणा निर्माण केली पाहिजे.