कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नम: ।’ हा नामजप ऐकल्यावर कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नम: ।’ हा नामजप आश्रमातील ध्वनीक्षेपकावर ऐकल्यावर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘१८.७.२०२१ ते २५.७.२०२१ या कालावधीत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीत विभागाच्या समन्वयक आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीतविशारद कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्री निर्विचाराय नम: ।’ हा नामजप आम्ही आश्रमातील ध्वनीक्षेपकावर ऐकला. त्या वेळी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील त्रास न्यून झाले. नामजपाच्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप करण्याचे महत्त्व !

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप अखंड केले, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संत आणि साधक यांना मिळालेले सूक्ष्म ज्ञान आणि साधकांना आलेल्या अनुभूती यांतील साम्य !

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप केल्यावर काय अनुभूती येतात, याची माहिती सद्गुरु गाडगीळ आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितली आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे चांगल्या अनुभूती बहुतेक साधकांना आल्या आहेत, हे येथील लिखाणावरून लक्षात येईल.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१८.७.२०२१

कु. तेजल पात्रीकर

या नामजपामुळे सगुण स्तरावरील शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे ते ग्रहण करणे सोपे झाले. त्यामुळे हा नामजप ऐकतांना देहाभोवतीचे त्रासदायक काळ्या शक्तीचे आवरण पुष्कळ प्रमाणात उणावले.

१९.७.२०२१

मला माझ्या डोक्यावर दाब जाणवणे, गळून जाणे आणि श्वास लागणे, हे त्रास होत असल्यामुळे मी या नामजपाच्या प्रयोगाच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते आणि खोलीत थांबले होते. सायंकाळी ५ ते ५.१० या कालावधीत आश्रमातील ध्वनीक्षेपकावर लागलेला नामजप मला खोलीत प्रत्यक्ष ऐकायला न येता त्याच्या नादाची स्पंदने सूक्ष्मातून अनुभवण्यास मिळाली आणि ‘मला डोक्यावर दाब जाणवणे अन् श्वास लागणे’, हे त्रास ३० टक्के इतके न्यून झाले.

२०.७.२०२१

नामजप ऐकतांना त्यातून सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य आणि आनंद मला पुष्कळ प्रमाणात जाणवला. त्यामुळे मला माझ्या हृदयाच्या ठिकाणी आनंददायी शीतल स्पंदने जाणवली आणि आज्ञाचक्रातून चैतन्याच्या शीतल लहरी माझ्या मस्तकात पसरल्याचे जाणवले.

२१.७.२०२१

नामजप करतांना माझ्या मनातील विचारांचे प्रमाण वाढले, माझे डोके दुखू लागले आणि मला घशावर दाब जाणवत होता. प्रयोगानंतरही माझा नामजप आपोआप चालू होता. तेव्हा मला होणारे त्रास न्यून झाले.

२२.७.२०२१

नामजप करतांना माझ्या मनातील विचारांचे प्रमाण वाढले, माझे डोके दुखू लागले आणि माझा श्वास लागू लागला. मला नामजप करता आला नाही; परंतु केवळ नामजप ऐकल्यामुळे माझा त्रास न्यून झाला.

कु. मधुरा भोसले

२३.७.२०२१

या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे नामजपाचा प्रयोग झाला नाही.

२४.७.२०२१

नामजप करतांना माझ्या मनातील विचारांचे प्रमाण वाढले, माझे डोके दुखू लागले आणि माझ्या घशावर दाब जाणवून माझा श्वास लागू लागला. मला नामजप करता आला नाही; परंतु केवळ नामजप ऐकल्यामुळे माझा त्रास न्यून झाला.

२५.७.२०२१

नामजप करतांना माझ्या घशावर आणि डोक्यावर दाब जाणवत होता अन् मला काहीही सुचत नव्हते. मला नामजप करता आला नाही. नामजप ऐकल्यामुळे माझा त्रास थोड्या प्रमाणात न्यून झाला आणि प्रयोगानंतर ३ – ४ घंटे मला त्रास होत होता.

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नम: ।’ या नामजपांतील आध्यात्मिक स्तरांवरील भेद

टीप – देवतांशी संबंधित असणार्‍या लोकांत सगुण चैतन्य कार्यरत असते. उदा. देवीलोक, रामलोक, वैकुंठ, शिवलोक इत्यादी. ऋषींशी संबंधित असणार्‍या लोकांमध्ये निर्गुण चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत असते, उदा. महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२१)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक